कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी गर्दी केली होती.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

kolhapur | दुचाकीस 200, रिक्षा, मोटारीस आता दोन हजारांचेच पेट्रोल

अफवांमुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे इंधन विक्रीवर निर्बंध

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : इंधन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यात दुचाकीसाठी 200 रुपये, तर रिक्षासह मोटारींसाठी आता दोन हजार रुपयांपर्यंतचेच पेट्रोल देण्यात येणार आहे. अनावश्यक गर्दीमुळे मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याद्वारे बुधवारी निर्बंध लागू केले आहेत.

नव्या निर्बंधांनुसार, दुचाकींसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत आणि तीनचाकी व मोटारींसाठी जास्तीत जास्त दोन हजार रुपयांपर्यंतच इंधन भरता येईल. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन मिळणार नाही. जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा आहे; मात्र वाहनधारकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे, असे आवाहनही पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

वाहनधारकांमध्ये वादावादी

पेट्रोल पंपांवर रांगेतून पुढे जाण्यावरून वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. यामुळे पंपांवर तणावपूर्ण वातावरण बनले होते. वास्तविक, वाहनधारकांनीही स्वयंशिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच पंपचालक, पुरवठा विभाग, पोलिस प्रशासनाने पंपांवर वाद होऊ नयेत, यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.

अत्यावश्यक सेवांसाठी प्राधान्याने इंधन पुरवठा

रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन दिले जाईल. प्रत्येक पेट्रोल पंपाने आपल्याकडील शिल्लक साठा, प्राप्त साठा आणि मागणी केलेल्या साठ्याच्या माहितीचा फलक दर्शनी लावणे बंधनकारक केले आहे. सर्व पंपधारकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. 25 ते 31 मार्च या कालावधीत हे निर्बंध लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

पहाटेपासूनच वाहनधारकांच्या रांगा

बुधवारी पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावल्याचे चित्र होते. अनेकांनी टाक्या फुल्ल करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या पंपांवर दुपारनंतरच पेट्रोल संपल्याचे बोर्ड लावण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT