कोल्हापूरः कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी आज अपेक्षेप्रमाणे अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. प्रशासनाने केलेल्या ‘स्वीप’ मोहिमेमुळे आणि प्रभाग रचनेच्या बदललेल्या गणितांमुळे सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मात्र, यंदाची निवडणूक केवळ केंद्रावरच नाही, तर सोशल मीडियावर देखील तितकीच गाजली.
आजच्या दिवसाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते एका रीलस्टारने बनवलेले विनोदी रील. बोटाला लावलेली निवडणूक शाई किती दिवस टिकते, हे ऐकून त्या मतदाराने, ‘हीच शाई केसांना लावायला हवी, म्हणजे दर पंधरा दिवसांनी डाय करण्याचा खर्च वाचला असता’, असा चिमटा काढला. हे रील प्रचंड व्हायरल झाले होते. प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांवर केलेली वैयक्तिक टीका आणि अतरंगी विधाने आज एडिटिंगच्या माध्यमातून पुन्हा जिवंत झाली. ‘जल्दी बोल पनवेल निकलना है’पासून ते ‘निकालानंतर कार्यकर्त्यांचा गजनी कसा होणार’ याच्या अनेक जुन्या-नव्या संवादांची आज दिवसभर सोशल मीडियावर तुफान खेचाखेची सुरू होती. प्रत्येक पक्षाच्या समर्थकांनी आपल्या नेत्याची बाजू वरचढ दाखवण्यासाठी मिम्सचा पाऊस पाडला.
केवळ राजकीय पक्षच नाही, तर कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिक, कापड दुकानदार आणि अन्य आस्थापनांनीही मतदानासाठी कंबर कसली होती. ‘लोकशाहीचा उत्सव साजरा करा, बोट दाखवा आणि सवलत मिळवा,’ अशा आशयाच्या अनेक कल्पक पोस्ट इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फिरत होत्या. तरुण मतदारांमध्ये सेल्फीचा क्रेझ कायम होता. मतदान केंद्राबाहेर असलेल्या ‘सेल्फी पॉईंट’वर फोटो काढून ते तात्काळ व्हॉटस्अॅप स्टेटसवर ठेवण्याची जणू स्पर्धाच लागली होती. त्याचबरोबर दर दोन तासांनी येणारी मतदानाची टक्केवारी आणि प्रभागांनुसार असलेली चुरस याचे ग्राफिक अपडेटस् प्रत्येक कोल्हापूरकराच्या मोबाईलमध्ये पोहोचत होत्या.