कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांना आता मोफत वायफाय सुविधा उपलब्ध झाली आहे. यासह लहान मुलांसाठी किडस् झोन, बचत गट आऊटलेट, मोबाईल स्क्रीनवरील वेळ कमी करून पुस्तक वाचण्यासाठी फ्लायब्ररी अर्थात विमानतळावरील स्फुट वाचनाची गोडी लावण्यासाठी कट्टा अशा नवीन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
कोइंबतूर येथील विमानतळावरून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे यांचे प्रमुख उपस्थित ऑनलाईन करण्यात आले. याप्रसंगी नागर विमान मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपीन कुमार उपस्थित होते. कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी सुविधेत आणखी एक टप्पा गाठला असून फ्री वायफाय मोबाईल नेटवर्क कव्हरेज आणि लॅपटॉपचा वापर करून त्यावर काम करणे अधिक सुलभ होणार आहे.
लहान मुलांसाठी वाचन कट्ट्यासह कागद, रंग, सॉफ्ट खेळणी अशा मुबलक वस्तू एका गालिच्यावर उपलब्ध करून दिल्या जातील. तिथे लहानग्यांच्या मोटर ॲक्टिव्हिटी आणि स्किल डेव्हलपमेंटमध्ये होत असलेल्या दुर्लक्षाकडे अल्प प्रमाणात का होईना लक्ष वेधून घेता येईल असा विश्वास विमानतळ प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. या सुविधांचा विमान प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विमानतळ प्रशासनाने केले आहे.