राजेंद्र जोशी
कोल्हापूर : एका जीवाणूचा अद़ृश्य धोका वेगाने समोर येतो आहे. तलाव, नद्या, माती, पाणीपुरवठा व्यवस्था, घरगुती जलसाठ्यांमध्येही आढळणार्या ‘फ्री लिव्हिंग अॅमिबा’चा हा धोका आहे. हे सूक्ष्म जीव भविष्यात सार्वजनिक आरोग्यापुढे मोठे संकट उभे करू शकतात, असा इशारा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी दिला आहे. विशेष म्हणजे वाढते जागतिक तापमान, उष्णतेच्या लाटा, जुनी जलवाहिनी व्यवस्था आणि अपुरी पाणी प्रक्रिया यामुळे हा धोका अधिक तीव्र होत असल्याचे याविषयीचा अभ्यास सांगतो आहे.
अमेरिकेसह काही देशांमध्ये असे मृत्यू झाले आहेत. भारतात अशा घटना तुलनेने कमी असल्या, तरी वाढते तापमान आणि उष्ण पाण्याचे स्रोत लक्षात घेता धोका नाकारता येत नाही.
ब्रेन इटिंग अॅमिबा
‘फ्री लिव्हिंग अॅमिबा’ हा नेग्लेरिया फाऊलेरी वा ब्रेन इटिंग अॅमिबा म्हणून ओळखला जातो. दूषित पाणी नाकावाटे शरीरात गेल्यानंतर हा अॅमिबा थेट मेंदूपर्यंत पोहोचतो आणि अत्यंत वेगाने संसर्ग पसरतो. या संसर्गातील मृत्यूदर अत्यंत जास्त असल्याचे जागतिक वैद्यकीय नोंदीतून स्पष्ट झाले आहे.
क्लोरिनला दाद देत नाही...
बायोकंटॅमिनंट नियतकालिकात याविषयीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हे जीवाणू केवळ स्वतः जीवघेणे संसर्ग निर्माण करीत नाहीत, तर इतर धोकादायक जीवाणू आणि विषाणूंनाही संरक्षण देतात. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेमधील जैव धोका अधिक पटीने वाढतो. चिंतेची बाब म्हणजे हे सूक्ष्म जीव क्लोरिनसारख्या पारंपरिक जंतुनाशकांना सहज दाद देत नाहीत. जुन्या जलवाहिन्या, गळती असलेल्या पाईपलाईन्स, अपुरी स्वच्छता आणि अनियमित पाणी प्रक्रिया यामुळे शहरांमधील पाणीपुरवठा व्यवस्था त्यांच्यासाठी आश्रयस्थान बनत आहे.
उष्ण हवामानात सक्रिय
विशेषतः उष्ण हवामानात हे अॅमिबा अधिक सक्रिय होत असल्याने भारतात वाढत्या तापमानात हा धोका अधोरेखित होऊ लागला आहे. याचा मुकाबला करण्यासाठी तज्ज्ञांनी ‘वन हेल्थ’ मॉडेलच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण आणि जलव्यवस्थापन विभागांनी संयुक्त कृती आराखडा तयार करण्याची शिफारसही केली आहे.
इतर जीवाणूंना आश्रय...
हे अॅमिबा इतर रोगकारक जीवाणूंना स्वतःच्या आत आश्रय देतात. या प्रक्रियेला ‘ट्रोजन हॉर्स इफेक्ट’ असे संबोेधिले जाते. अशा सुरक्षित वातावरणात जीवाणू, जंतुनाशकापासून बचाव करतात आणि दीर्घकाळ पाणी व्यवस्थेत टिकून राहतात. त्यामुळे भविष्यात प्रतिजैविक प्रतिकारशक्ती (अँटिबायोटिक रेझिस्टन्स) वाढण्याचा धोकाही काही पटीने वाढत असल्याचे संशोधकांचे मत आहे.