अनिल देशमुख
कोल्हापूर : पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ), चालक, वाहक आणि शारीरिक चाचणी बंधनकारक असलेल्या शासकीय पदांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या त्यांच्या मालकीची किंवा व्यवस्थापनाखालील मैदाने, क्रीडांगणे आणि धावपट्ट्या सरावासाठी या उमेदवारांना पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत.
शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी मोकळी मैदाने व सुविधा नसल्याने अनेक उमेदवारांना खाजगी प्रशिक्षण संस्थांवर अवाजवी खर्च करावा लागतो. अनेकदा मैदानाअभावी सरावाशिवाय चाचणीला सामोरे जावे लागते. यासर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करा, याकरीता नोडल अधिकारीही नेमा तसेच योग्य सरावासाठी तांत्रिक मार्गदर्शनही उपलब्ध करून द्या, असेही आदेश दिले आहेत.
मूलभूत सुविधांही द्याव्या लागणार
या आदेशानुसार सराव करणाऱ्या उमेदवारांसाठी स्वच्छ व सुरक्षित धावपट्टी, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, बदलकक्ष (चेंजिंग रूम), पुरेशी प्रकाशव्यवस्था, वाहनतळ तसेच प्रथमोपचार आणि प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क अशा सुविधा विनामूल्य उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
केव्हा मिळणार मैदान
भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते संबंधित संवर्गाची मैदानी चाचणी संपेपर्यंत सराव करता येणार. पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळांना प्राधान्य दिले जाणार.
अभ्यास आणि आरोग्य शिबिर घ्या
सराव करणाऱ्या उमेदवारांसाठी वाचनालयात पोलिस भरतीविषयक संदर्भ साहित्य व मार्गदर्शन कक्ष सुरू करा. उमेदवारांची विनामूल्य आरोग्य आणि नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करा, अशा सूचनाही मनपा, नगरपालिकांना दिल्या आहेत.
कोणतेही शुल्क नाही
या मैदानांच्या वापरासाठी उमेदवारांकडून कोणतेही भाडे, प्रवेशशुल्क, वापरशुल्क किंवा अनामत रक्कम आकारता येणार नाही. तसेच हे मैदान कोणत्याही संस्थेला, संघटनेला देण्यात येणार नाही, असेही या आदेशात केले आहे.