इचलकरंजी पुढारी वृत्तसेवा : कापड खरेदी व्यवहारात १८लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत गावभाग पोलिसांनी शुक्रवारी महंमद शाह (रा. वडाळा, मुंबई), आनंद सारडा (रा. वखारभाग, सांगली), नरेश ऊर्फ बबलू सोनी (रा. इचलकरंजी) आणि आदेश दुबे (रा. अंधेरी, मुंबई) या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद लता मुंदडा (रा. महालक्ष्मी रेसिडेन्सी, इचलकरंजी) यांनी दिली आहे.
मुंदडा यांचे महालक्ष्मी रेसिडेन्सी येथे कार्यालय आहे. त्यांच्याकडून आदेश दुबे, आनंद सारडा व नरेश सोनी यांनी वेळोवेळी १६ लाख ९४ हजार ४३४ रुपयांचे कापड उधारीवर घेतले होते. त्यापैकी १ लाख ४९ हजार ००३ रुपयांची रक्कम मुंदडा यांना मिळाली. उर्वरित १५ लाख ४५ हजार ४३१ रुपये वारंवार मागणी करूनही ते मिळाले नाहीत. याच पद्धतीने बुशरा कलेक्शनचे महंमद शाह यांनी ४ लाख २९ हजार ६८८ रुपयांचे कापड उधारीवर घेतले होते. मुंदडा यांना निव्वळ ९० हजार ८७६ रुपये देण्यात आले. उर्वरित ३ लाख ३८ हजार रुपये मिळाले नाहीत. पैशाबाबत वारंवार मागणी करूनही संशयीतांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे याबाबत मुंदडा यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गावभाग पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास सपोनि भागवत मुळीक व गाडवे करीत आहेत.
हेही वाचा