Fraud Case | मालमत्ता परस्पर बँकेकडे गहाण ठेवून 1.10 कोटीची फसवणूक File Photo
कोल्हापूर

Fraud Case | मालमत्ता परस्पर बँकेकडे गहाण ठेवून 1.10 कोटीची फसवणूक

डोंबिवली बँकेच्या अध्यक्षासह 21 जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : भागीदारीमधील मिळकत परस्पर बँकेकडे गहाण ठेवून 1 कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भागीदार, बँकेच्या अध्यक्षासह 21 जणांवर राजारामपुरी पोलिसांत न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मारुती बबनराव जाधव (वय 53, रा. फुलसुंदर मार्केट, नारायणगाव, पुणे) यांनी दिली आहे.

मारुती जाधव हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांनी दत्तात्रय सुरेश शिंगोटे (वय 40) आणि पूनम दत्तात्रय शिंगोटे (34, दोघे रा. अलदरे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्यासोबत नारायणगाव येथे 2012-13 मध्ये एकत्र जमीन खरेदी केली होती. जाधव यांनी ही जमीन विकसित करून शिंगोटे दाम्पत्याला एक सदनिका देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे जाधव यांनी शिंगोटेना एक सदनिका दिली होती. त्यामुळे इतर मिळकतीत शिंगोटे दाम्पत्याचा काही अधिकार नव्हता.

पण, शिंगोटे दाम्पत्याने डोंबिवली नागरी सहकारी बँकेत अध्यक्ष उदय माधुसुदन कवेर (वय 57, रा. सोनारपाडा, डोंबिवली) याच्या मदतीने जाधव यांची मालमत्ता संगनमताने परस्पर गहाण ठेवून 2 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज मंजुरीवेळी राजारामपुरी शाखेचे अधिकारी श्रीकांत एम. कुलकर्णी (63) आणि इचलकरंजी शाखेचे अधिकारी दीपक दशरथ घाटेकर (49, दोघे रा. अमेय एम्पायर, राजारामपुरी 1 ली गल्ली) हे तेथे उपस्थित होते. यासह बँकेचे अन्य संचालक, अधिकारी यांनी संगनमताने जाधव यांची फसवणूक करत शिंगोटे दाम्पत्याला कर्ज दिले, असा जाधव यांचा आरोप आहे. हा प्रकार लक्षात येताच जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार राजरामपुरी पोलिसांनी चौकशी केली. चौकशीमध्ये कर्ज प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर केल्याचे निदर्शनास आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, शिंगोटे दाम्पत्याने कर्जाचे हप्ते थकविल्याने बँकेने संबंधित मिळकतीवर जप्तीची कारवाई सुरू केली. बेकायदेशीररीत्या ही कारवाई होत असल्याने जाधव यांनी याबाबतची फिर्याद राजारामपुरी पोलिसांत दिली.

त्यानुसार शिंगोटे दाम्पत्य, बँकेच्या अध्यक्षासह जयंत लक्ष्मण पित्रे, अच्युत मधुसुदन कर्‍हाडकर, नंदिती शशिकांत कुलकर्णी, गणेश हरिहर नाईक, शिवाजी सुदाम पाटील, मिलिंद माधव कोपरकर, सुधाकर दत्तात्रय पातकर, प्रभाकर रामचंद्र वाणी, दीपक वसंत नामजोशी, नामदेव दत्तात्रय खंदारे, सतीश दत्तात्रय ओक, लहानू रूपजी कोंढारी, पुरषोत्तम भुमया कुंदेन, सुहास राघवेंद्र कुलकर्णी, महेश सिद्धेश्वर फणसे, गोपाळ गिरीधर परांजपे (सर्व रा. सोनारपाडा, डोंबिवली) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT