शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : स्क्रॅप व्यावसायिक असलेली रचना अॅग्रो सर्व्हिसेस व पीपी ट्रेडर्स या कंपन्यांनी सुमारे साडेपाच कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विनायक सुकुमार लाड यांनी शिरोली पोलिसांत दाखल केली आहे.
विनायक सुकुमार लाड (वय 27, रा. पुलाची शिरोली) यांच्या वडिलांचा 25 वर्षांपासून स्कॅ्रप व्यवसाय असून, रॉ मटेरियल सीआय बोरिंग व एमएस स्कॅ्रपची भावेश्वरी इंडस्ट्रीज नावाची फर्म आहे. डिसेंबर 2023 मध्ये विनायकच्या वडिलांचे निधन झाले. या फर्मकडून विविध कंपन्यांना माल पुरविण्यात येत होता. त्यापैकी रचना अॅग्रो सर्व्हिसेस या फर्मचे प्रोप्रायटर कल्पेश बाळासो कुंभार (रा. घुडेवाडी, आवळी खुर्द, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) व पीपी ट्रेडर्स या फर्मचे प्रोप्रायटर पांडुरंग मारुती कुंभार (रा. दत्त मंदिरजवळ, घुगेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांची स्क्रॅप व्यवसायामधूनच विनायक यांच्याबरोबर ओळख होती.
सन 2021 पासून विनायक यांनी या व्यवसायात पूर्ण लक्ष घातले. कल्पेश कुंभार याच्या मागणीप्रमाणे त्यांनी स्क्रॅप पुरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीस विनायक यांनी कुंभार याला साधारणत: 50 ते 70 लाख रुपयांचा कच्चा माल दिला होता. त्याचे पैसे विनायक यांना रोखीने दिल्याने विनायक यांचा कुंभार याच्यावर विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे विनायक यांनी कुंभार याच्या मागणीप्रमाणे रचना अॅग्रो सर्व्हिसेस व पीपी ट्रेडर्स या फर्मना स्क्रॅप दिले होते. विनायक व कुंभार यांच्यामध्ये या व्यवहाराचा करार करण्यात आला होता. त्यानुसार दिलेल्या स्कॅ्रपचे 5 कोटी 56 लाख 85 हजार 778 रुपये द्यावेत, अशी मागणी विनायक यांनी कुंभार याच्याकडे वारंवार केली. मात्र, कल्पेश कुंभार याने रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. काही वेळा फोनवरून तुझे पैसे देत नाही, काही करायचे ते कर, अशी धमकी दिल्याचे विनायक यांनी फिर्यादीत म्हटले आहे.