शहराच्या तीनही बाजूने पंचगंगा नदी वाहते. तरीदेखील कोल्हापूरला नियमित, मुबलक पाणीपुरवठा होत नाही. शिंगणापूरच्या दोन, कळंबा, बालिंगा अशा पूर्वीच्या योजना आहेत. नव्याने थेट पाईपलाईन योजना सुरू झाली आहे. कित्येक कोटी रुपये पाण्यावर खर्च होत आहेत. कधी उपसा पंप बिघडतात. कधी गळती लागते. यामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो. कोट्यवधी रुपयांच्या योजना असूनही कोल्हापूरला टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. या सर्वांचा वेध घेणारी मालिका आजपासून...
कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या चार योजना सुरू आहेत. मात्र यावर झालेला खर्च पाण्यात गेला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अनेक भागात पाणीपुरवठा अजूनही अनियमित असून काही नळांना थेंबही पाणी येत नाही. काही भागात गळतीमुळे पाणी वाया जात आहे. काही नळ कोरडेच आहेत. यापैकी शिंगणापूर योजना जुनी व नवी आणि आता थेट पाईपलाईन या कोट्यवधी रुपयांच्या योजना खर्चाने ओथंबल्या आहेत. मनपा पाणीपुरवठा विभागाने सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याच्या नवी टाक्या पूर्णत्वाकडे आहेत. या टाक्या झाल्यानंतर पाण्याचे समान वाटप झाले तरच प्रश्न सुटणार आहे.
कळंबा तलावावर केलेली योजना सर्वात जुनी आहे. नैसर्गिक उताराने दगडी पाटाद्वारे हे पाणी तलावातून थेट मंगळवार पेठेत पाण्याचा खजिनामध्ये येऊन पडते. तेथून ते नैसर्गिक उताराने शहरांच्या पेठांत पोहोचते. बागल चौक पर्यंत आजही हे पाणी पुरविले जाते. कमी विद्युत खर्चातील ही किफायतशीर योजना आजही सुरू आहे.
पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 45 कोटी रुपयांची शिंगणापूर योजना 1995 मध्ये करण्यात आली. गळकी योजना म्हणून या योजनेने बदलौकिक मिळविला. फुटलेल्या पाईपलाईन बदलण्यावर योजनेइतकाच खर्च करण्याची वेळ महापालिकेवर आली. गळक्या योजनेवरही कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. त्यानंतर ई वॉर्डसाठी स्वतंत्र शिंगणापूर योजना येथून करण्यात आली. यावरही 20 कोटींचा खर्च झाला. कालांतराने या दोन्ही योजनेतील उपसा पंप बदलावे लागले. सध्या त्याच्यावर 3 कोटी 50 लाखाचा खर्च झाला आहे.
75 वर्षांपूर्वी बांधलेल्या बालिंगा योजेतून नदीतून नैसर्गिक उताराने पाणी उपसा केंद्रापर्यंत पाणी येते. तेथून उपसा करून ते बालिंगा गावात आणले जाते. या योजनेतून विद्युत खर्चाची बचत करण्यात आली आहे. आजही ही योजना शहराच्याद़ृष्टीने महत्त्वाची आहे. आजवर या योजनेने कोट्यवधी रुपयांच्या वीज बिलाची बचत केली आहे. पण शिंगणापूरच्या दोन्ही योजना आणि आता थेट पाईपलाईन योजना खर्चिक आहेेत. सध्या एक ना धड अशीच पाणीपुरवठा योजनांची अवस्था झाली आहे.