Mummewadi Ghat Accident | सुट्टीसाठी गावी आले... अपघाताने कुटुंब हिरावले 
कोल्हापूर

Chande Family Death | सुट्टीसाठी गावी आले... अपघाताने कुटुंब हिरावले

वास्तुशांतीपूर्वीच चांदे कुटुंबावर काळाचा घाला; नव्‍या घरात राहण्‍याचे स्‍वप्‍न अधुरेच

पुढारी वृत्तसेवा

विजय पाटील

उत्तूर : निपाणी–आजरा मार्गावरील मुम्मेवाडी घाटात झालेल्या भीषण अपघातात होन्याळी (ता. आजरा) येथील चांदे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने गावासह नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. उन्हाळी सुट्टीसाठी मुंबईहून गावी आलेल्या कुटुंबाचा क्षणात अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चांदे कुटुंबाने गेल्यावर्षीच होन्याळी येथे घर बांधले होते. मात्र, त्याची अद्याप वास्तुशांतीही झाली नव्हती. नव्या घरात आनंदाचे क्षण अनुभवण्यापूर्वीच या कुटुंबावर काळाने घाला घातला.

या अपघातात दीपक दत्तात्रय चांदे, पत्नी शोभाे, मुलगा जय आणि मुलगी पूर्वा यांचा जागीच मृत्यू झाला. दीपक चांदे हे कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. ते आई, मोठ्या भावाच्या कुटुंबासह एकत्र राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या भावाचेही निधन झाले होते. त्यामुळे घरातील संपूर्ण जबाबदारी दीपक यांच्यावरच होती.

चांदे कुटुंब उन्हाळी सुट्टीसाठी होन्याळी येथे आले होते. सायंकाळी दुंडगे-माद्याळ येथे नातेवाईकांकडे जात असताना मुम्मेवाडी घाटात त्यांच्या दुचाकीला मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, चौघांचाही जागीच मृत्यू झाला. उत्तूर - गडहिंग्लज काँक्रिटीकरण रस्ता सुरू असल्यामुळे चांदे कुटुंबीयांनी मुम्मेवाडी - बहिरेवाडी मार्गे दुंडगे माद्याळला जाण्याचे निश्चित केले; पण घाटात त्यांच्यावर काळाने घाला घातला. चांदे कुटुंबाने गेल्यावर्षीच होन्याळी येथे घर बांधले होते. मात्र, त्या घराची अद्याप वास्तुशांतीही झाली नव्हती.

नव्या घरात आनंदाचे क्षण अनुभवण्यापूर्वीच संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. नव्या घराच्या उंबरठ्यावर सुखाचे दिवस येण्याआधीच दु:खाचा डोंगर कोसळल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एका अपघाताने चार निष्पाप जीव हिरावून घेतल्याने होन्याळी गावात शोककळा पसरली असून, चांदे कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण परिसर सहभागी झाला आहे.

माहेरवाशिणीची वाट पाहत बसले होते

चांदे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यात असल्याने गावी क्वचितच येणे-जाणे होत होते. यावर्षी मुलांसह उन्हाळ्याची सुट्टी आनंदात घालवायचे असे ठरवून आलेल्या चांदे कुटुंबीयांनी होन्याळी येथे आठ-दहा दिवस मौजमजा केली व दुंडगे माद्याळ येथे पूजा यांच्या माहेरी थोडे दिवस राहण्यास निघाले होते. परंतु, नियतीला हे मान्य नव्हते. माहेरवाशीण येणार असल्याने सगळे त्यांची वाट पाहत बसले होते; पण त्यांच्यावर मृतदेह पाहण्याची वेळ आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT