शिरढोण : तेरवाड (ता. शिरोळ) येथे भरधाव कंटेनरने दोन पादचारी महिला आणि तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीसह तिघांचा जागीच, तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास कुरुंदवाड-तेरवाड मार्गावर वजन काट्याजवळ घडला.
अपघातात भाऊसोा जयपाल गिरमल (५०) व त्यांच्या पत्नी अश्विनी भाऊसो गिरमल (४५, दोघे रा. अब्दुललाट, ता. शिरोळ), मंगल सदाशिव पाटील (४२, रा. गंगापूर, तेरवाड, ता. शिरोळ) व शकिल अन्वर मुल्ला (३६, रा. अर्जुनवाड, ता. शिरोळ) या चौघांचा मृत्यू झाला. तर, सागर बाळासाहेब कानडे (रा. अर्जुनवाड) व ललिता गणपती पाटील (रा. गंगापूर, तेरवाड) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबतची माहिती अशी, मालवाहतूक कंटेनर हा हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. यावेळी चालकाचा ताबा सुटल्यानंतर कंटेनरने दोन पादचारी महिलांना धडक दिल्यानंतर पुढे जाणाऱ्या तीन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर कंटेनर रस्त्याकडील झाडाला धडकून शेतात घुसला. यात जखमी पादचारी मंगल पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ललिता पाटील गंभीर जखमी आहेत. एका दुचाकीवरील गिरमल दाम्पत्य हे जागीच ठार झाले. दुसऱ्या दुचाकीवरील शकिल मुल्ला हे जागीच ठार झाले. तर, सागर कानडे गंभीर जखमी झाले. तिसऱ्या दुचाकीवरील जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची नावे समजली नव्हती.
रक्ताचे थारोळे अन् नातेवाईकांचा आक्रोश
घटनास्थळी रक्ताचे थारोळे दिसत होते. अपघातस्थळी चित्र पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. घटनास्थळी नातेवाईक आल्यानंतर आक्रोश केला. दरम्यान, याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत करुंदवाड पोलिसांत करण्याचे काम सुरू होते.