प्रातिनिधिक छायाचित्र  (File Photo)
कोल्हापूर

kolhapur | चार दिवस मुलाला शोधला, त्याचा मृतदेह घराच्याच छतावर आढळला

अडगळीच्या खोलीत घेतला गळफास; शिवाजी पेठेतील घटना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘मुलगा बेपत्ता झालाय’ या एका वाक्याने आईच्या जीवात उरलेला जीवही रविवारी सकाळी एका क्षणात निघून गेला. चार दिवस ज्या मुलाला शेजारी, पाहुणे, नातेवाईकांत आणि पोलिसांत हंबरडा फोडत आई शोधत होती, त्याच पोटच्या गोळ्याचा मृतदेह स्वतःच्याच घराच्या दुसऱ्या मजल्यावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. शिवाजी पेठेत घडलेल्‍या या घटनेने हळहळ व्‍यक्‍त होत आहे.

सुहास शिवाप्पा तळेकरी (वय ४८, रा. लाड चौक) सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाचा गाडा हाकत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर आजारपण व कौटुंबिक तणावामुळे ताे चिंताग्रस्‍त होता. कौटुंबिक कारणामुळे पत्नी व मुलगी सुळे (ता. राधानगरी) येथे राहात असल्याने सुहास व त्याची आई असे दोघेच गौड यांच्‍या भाड्याने घेतलेल्‍या दुमजली घरात होते. सोमवारपासून सुहास बेपत्ता झाला. घरच्यांना तो कुठेतरी गेला असेल, असे वाटले. पण दोन दिवस तो न परतल्‍याने आईची धडधड वाढली. शेवटी बुधवारी (दि. २६) तिने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची फिर्याद दिली. सोबतच नातेवाईक, मित्रांकडे ‘सुहास कुठं आहे?’ अशी चौकशी केली. पण उत्तर मिळत नव्‍हते.

रविवारी सकाळी घराच्या दुसऱ्या मजल्यावरून विचित्र व अस्वस्थ करणारी दुर्गंधी पसरली. धावत जाऊन आईने त्या अडगळीच्या खोलीचा दरवाजा ढकलला खरा; पण समोरचे दृश्‍य पाहून तिच्‍या पायाखालची जमीनच सरकली. सुहासने साडीने गळफास घेतला होता आणि चार दिवसांत मृतदेह सडल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. मुलगा बेपत्ता झाल्यापासून आईने शोधासाठी टाहो फोडला, त्याच घराच्या छताखाली पोटचा गोळा चार दिवस मृतावस्थेत पडून होता, ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. पोलिस आले, पंचनामा झाला, मृतदेह शवविच्छेदनासाठी गेला आणि पोलिस प्रकरणाच्‍या तपासाला लागले. ही दुर्दैवी घटना मात्र अनेकांच्‍या काळजाला चरे पाडून गेली.

सहा महिन्यापूर्वी अपघात

सुहास सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सहा महिन्यापूर्वी कामावरच अपघात होऊन त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला दारूचेही व्यसन होते. तो नियमित कामावरही जात नव्हता. त्याच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता.

कुटुंब पोरके

मूळ कर्नाटकातील तळेकरी कुटुंब १० वर्षांपासून कोल्हापुरात स्थायिक आहे. आई व बहीण सुहाससोबत राहात होते. कौटुंबिक कारणास्तव पत्नी व मुलगी काही दिवसांपासून राधानगरी येथील सुळे येथे स्थायिक झाले आहेत. नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली काय, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT