पन्हाळा किल्ला 
कोल्हापूर

कोल्हापूर : पन्हाळ्यासाठी किल्लाकेंद्रित आपत्ती व्यवस्थापन आराखडा

देशातील पहिला प्रयोग; राष्ट्रीय पातळीवर ठरणार दिशादर्शक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः पन्हाळा किल्ल्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखडा देशातील किल्ल्यांबाबतचा आदर्श आराखडा म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. युनेस्कोमार्फत संरक्षित जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी किल्ल्यासाठी ठोस आराखडा तयार करणे गरजेचे होते. नुकत्याच युनेस्कोच्या निरीक्षण पथकाने पन्हाळा किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळी किल्ल्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा अभाव हा मुद्दा पुढे आला होता.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ उपाययोजना म्हणून या आराखड्याच्या निर्मितीचे काम सुरू केले. यासाठी पल्लोडियम या संस्थेला ज्ञानभागीदार (नॉलेज पार्टनर) म्हणून नियुक्त केले होते. ही संस्था कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी नॉलेज पार्टनर म्हणून नियुक्त केली आहे. पन्हाळा किल्ल्याची ही आपत्ती व्यवस्थापन योजना भारतातील पहिली किल्लाकेंद्रित योजना ठरली आहे. या योजनेत किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अद्ययावत उपाय समाविष्ट आहेत. योजनेच्या उत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने (NDMA) तिला मॉडेल DMP म्हणून मान्यता द्यावी, असे महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन समितीचे संचालक सतीशकुमार खडके यांनी पत्र लिहून सुचवले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच आराखडा असल्याने तो राष्ट्रीय पातळीवर आदर्श आराखडा म्हणून स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे.

या योजनेबद्दल पत्र लिहून त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कौतुक केले आहे. या पत्रात म्हटले आहे की,जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तसेच सर्व विभाग आणि एजन्सींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही योजना तयार झाली आहे. ही योजना इतर जिल्ह्यांना दिशादर्शक ठरेल. त्यांनी पुढे नमूद केले की, पन्हाळा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व लक्षात घेऊन तयार केलेला हा आराखडा धोका व्यवस्थापनासाठीचा आदर्श नमुना ठरेल. संशोधन, माहिती गोळा करणे आणि विश्लेषण यासाठी या योजनेवर काम करणार्‍या सर्व पथकाचे अभिनंदन .

आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची वैशिष्ट्ये

  • वारसा आणि पर्यटकांचे संरक्षण : ऐतिहासिक वास्तूंना आपत्तींपासून वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन

  • आणीबाणी व्यवस्थापन : स्थलांतर मार्ग, सुरक्षित ठिकाणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे

  • जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावरील ओळख : कोल्हापूरमध्ये तयार झालेली योजना देशभर आदर्श म्हणून वापरण्यात येणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT