जयसिंगपूर : ‘आनंदी आनंद गडे... जिकडे तिकडे चोहीकडे...’ असे गीत म्हणतच माजी शिक्षक विनायक सकाराम कुंभार (वय 78, सध्या रा. मगदूम सोसायटी, जयसिंगपूर, मूळ गाव वारणा कोडोली, ता. पन्हाळा) यांनी शेवटचा श्वास घेतला. या घटनेने उदगाव व जयसिंगपूर परिसरात शोककाळ पसरली आहे.
उदगाव (ता. शिरोळ) येथील आप्पासाहेब ऊर्फ डॉ. सा. रे. पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या नवीन सभागृहात सन 2001-02 च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुक्रवारी आयोजित केला होता. 10 वाजता 100 हून अधिक माजी विद्यार्थी एकत्रित झाले. माजी शिक्षक विनायक कुंभार व इतर शिक्षक राष्ट्रीय गीत व प्रार्थना घेऊन सभागृहात दाखल झाले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर सर्व आजी-माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली.
या सर्व घटनाक्रमानंतर 2005 साली निवृत्त झालेले विनायक सकाराम कुंभार यांना प्रथम मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात माणसाबरोबर चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे. पैसे, सोने, संपत्ती ही आपल्याला जगवत नसून माणुसकीच जगायला शिकवते असे भावुक मनोगत व्यक्त करून भाषणाच्या शेवटी जीवनात आनंदी राहण्यासाठी मी तुम्हाला एक गीत गाऊन दाखवतो, असे म्हणून ‘जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे... वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नभात फिरला जगात उरला...’ या वाक्यापर्यंत आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते कार्यक्रमास्थळी कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा माजी विद्यार्थी-विद्यार्थ्यांना जोराचा धक्का बसला. काही विद्यार्थिनींचा आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता.
त्यांना तातडीने सांगलीत खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. त्यांचा एक मुलगा पुणे व दुसरा मुलगा दिल्ली येथे असल्याने मृतदेह खासगी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. मुले गावी आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उदगावातील या घटनेमुळे जयसिंगपूर व उदगावात शोककळा पसरली आहे. माजी शिक्षक कुंभार यांच्या पत्नीचेही काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे. मुले नोकरीनिमित्त बाहेर असल्याने ते एकटेच घरी राहत होते.