Hasan Mushrif | जिल्‍हा बँकेचा दंड माजी आ. संजय घाटगे भरणार 
कोल्हापूर

Hasan Mushrif | जिल्‍हा बँकेचा दंड माजी आ. संजय घाटगे भरणार

बँकेचे अध्‍यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोल्‍हापूर जिल्‍हा बँकेला केलेला १३.३० लाख रुपयांचा दंड भरण्‍याची तयारी माजी आमदार संजय घाटगे यांनी दर्शवली आहे, अशी स्‍पष्‍टोक्‍ती बँकेचे अध्‍यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे दिली आहे. अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या कर्जामुळे बँकेचे कोणतेही नुकसान होऊ देणार नसल्‍याचेही घाटगे यांनी आश्‍वासन दिले आहे, असेही पत्रकात म्‍हटले आहे.

पत्रकात म्‍हटले आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार बँकेच्‍या संचालकांना त्यांच्या फर्म, कंपन्यांना अर्थपुरवठा करता येत नाही. नाबार्डच्या तपासणीमध्ये बँकेचे तज्ज्ञ संचालक संजय घाटगे यांच्या अन्‍नपूर्णा साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याबद्दल आक्षेप घेतला. कारखान्‍याला दिलेले कर्ज हे घाटगे संचालक होण्यापूर्वी १८ जून २०१९ ला दिले आहे. त्यानंतर सव्वा पाच वर्षांनी त्यांची तज्ज्ञ संचालकपदी निवड झाली. नाबार्डच्या आक्षेपानंतर घाटगे यांनी ३० मार्च २०२६ रोजी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जिल्‍हा बँकेच्या संचालक मंडळात घाटगे तज्ज्ञ संचालक आहेत. ही माहिती देऊनही बँकेला दंड केला आहे.

डीफ खात्‍यामधील रक्‍कम वेळोवेळी रिझर्व्ह बँकेला पाठविली जाते. न्यायालयाचे आदेश आणि स्थगिती, कायदेशीर कारवाई, वादविवाद व अन्‍य कारणांमुळे गोठविलेल्‍या खात्‍यातील रक्‍कम तांत्रिकदृष्ट्या सिस्टीममधून गेलेली नाही. नाबार्डच्या तपासणीमध्ये ही बाब निदर्शनास आल्यानंतर ही रक्कम तातडीने आरबीआयकडे वर्ग केली. या दोन कारणांमुळे बँकेला झालेला दंड माफ करण्या‍बाबत आरबीआयकडे पुन्हा अपील करणार असल्‍याचे पत्रकात म्‍हटले आहे.

हेर्ले (ता. हातकणंगले) येथील हृदया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला २०२३-२४ मध्ये ७.५ कोटी रुपये कर्ज मंजूर केले. कंपनीने बँकेच्‍या अटींची पूर्तता केल्‍यानंतर कर्ज रक्कम आर.टी.जी.एस.द्वारे संबंधित कंपनीच्‍या खात्‍यामध्‍ये वर्ग केली. त्यांच्या आर्थिक व्यवहारांशी बँकेचा संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT