कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक असलेले समरजित घाटगे यांची अचानक युती झाल्यानंतर मुश्रीफ यांचे नाराज असलेले मित्र संजय घाटगे व त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे यांनी गुरुवारी जिल्हा बँकेत दुपारी भेट घेतली. तिघांमध्ये सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली.
मुश्रीफ व समरजित घाटगे एकत्र आल्यामुळे कागल तालुक्यातील चित्र बदलले आहे. मुश्रीफ व समरजित घाटगे यांना एकत्र आणण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थीची भूमिका बजाविली. मुश्रीफ व समरजित घाटगे एकत्र आल्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीतील चित्र देखील बदलले. येथे भाजपचे उमेदवारी अर्ज देण्याचे थांबविण्याच्या सूचना संजय घाटगे यांना देण्यात आल्याचे कळते. यामुळे ते नाराज होणे स्वाभाविक आहे. त्यांची समजूत काढण्यात येईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर गुरुवारी घाटगे पिता-पुत्रांनी मुश्रीफ यांची जिल्हा बँकेत भेट घेतली.
दुपारी एकच्या सुमारास घाटगे पिता-पुत्र जिल्हा बँकेत आले आणि मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. या भेटीत मुश्रीफ यांनी आपणास हा निर्णय का घ्यावा लागला याचे स्पष्टीकरण केले. यासंदर्भात आपल्याशी बोलण्याची संधी देखील मिळाली नाही, एवढ्या झटपट काही घटना घडल्या. याबद्दल मुश्रीफ यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली. आपण व समरजित घाटगे एकत्र आलो असलो तरी आपल्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आपल्यालाही सोबत घेतले जाईल, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.
एकही जागा न दिल्याने संजय घाटगे यांची नाराजी
नगरपालिकेमध्ये संजय घाटगे गटाला एकही जागा न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. किमान दोन जागा द्यावयास हव्या होत्या, असे घाटगे यांनी मुश्रीफांना सांगितल्याचे समजते.