कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी माजी महापौर सई खराडे, शिवाजी पेठ प्रभागातून इच्छुक असणारे त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित आडगुळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे भगवा ध्वज देऊन स्वागत केले. पक्ष प्रवेशासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला.
आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मातब्बर उमेदवारांवर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू आहे. यामध्ये शिवसेनाही मागे नाही. काँग्रेसच्या काही पदाधिकार्यांनी यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता खराडे आणि आडगुळे यांच्या रूपाने पुन्हा पक्ष प्रवेशास सुरुवात झाली आहे.
सई खराडे यांनी चंद्रेश्वर प्रभागातून दोनवेळा महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. तत्कालीन ताराराणी आघाडीकडून प्रथम महापौर झाल्या, तर सत्तांतरामुळे त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करून महापौरपद कायम ठेवले होते. माजी कृषिमंत्री कै. श्रीपतराव बोंद्रे यांच्या त्या पुतणी, तर कै. महिपतराव बोंद्रे यांची कन्या आहेत. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै. सखाराम बापू खराडे यांच्या स्नुषा आहेत. याबरोबरच माजी महापौर आणि अॅड. महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव इंद्रजित आडगुळे यांनीही धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर हे उपस्थित होते.