कोल्हापूर

कोल्हापूर : माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांचे निधन

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा माजी महापौर प्रल्हाद भाऊसो चव्हाण (वय 83) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आठ दिवसांपूर्वीच कोल्हापुरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या चव्हाण यांनी सलग 18 वर्षे शहराध्यक्षपद भूषविले. शांत, संयमी आणि सुस्वभावी, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते म्हणून ते परिचित होते. माजी महापौर सागर चव्हाण व काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांचे ते वडील होत.

महापालिकेच्या स्थापनेपूर्वी कोल्हापूर कौन्सिलमध्ये 1967 ते 1972 या कालावधीत सदस्य होते. त्यानंतर महापालिकेची स्थापना झाल्यावर पहिल्याच सभागृहासाठीही ते निवडून आले. 1972 ते 1978 या कालावधीत ते नगरसेवक होते. पुढे 1985-90, 1990-95, 1995-2000 असे सलग 15 वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिले. या कालावधीत 16 नोव्हेंबर 1996 ते 17 नोव्हेंबर 1997 पर्यंत त्यांनी महापौरपद भूषविले. अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी अनेकवेळा सभागृह गाजविले. 30 ऑक्टोबर 2000 पासून पुढे 18 वर्षे काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

शेतकरी कुटुंबातील चव्हाण यांना समाजकार्याची आवड होती. ते फुटबॉलपट्टू होते. तसेच दांडपट्टा खेळण्यातही तरबेज होते. त्यांनी महाकाली फुटबॉल क्लबची स्थापना करून अनेक खेळाडूंना घडविले. राजाराम टिंबर मार्केट वसविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. हुतात्मा पार्कचे सुशोभिकरण, तावडे हॉटेल येथे स्वागत कमान उभारली. 'स्वच्छ व सुंदर कोल्हापूर'चा नारा देऊन शहराला सौंदर्याचा चेहरा दिला. हजारांवर रोजंदारी कर्मचार्‍यांना त्यांनी सेवेत कायम केले. कोल्हापुरातील विविध प्रश्न सोडविण्यात त्यांचा पुढाकार होता. मंडप व्यावसायिकांचे त्यांनी राज्यस्तरावर संघटन उभारले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT