Kolhapur Gokul Election | ‘गोकुळ’चे माजी संचालक पुन्‍हा न्‍यायालयात जाणार 
कोल्हापूर

Kolhapur Gokul Election | ‘गोकुळ’चे माजी संचालक पुन्‍हा न्‍यायालयात जाणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : अवसायन प्रक्रियेतील अपात्र ठरलेल्‍या ५६९ दूध संस्‍थांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी गोकुळमधील महायुतीचे माजी संचालक पुन्‍हा न्‍यायालयात दाद मागणार आहेत. अपात्र दूध संस्‍थांसंदर्भात माजी संचालकांची बुधवारी (दि.१७) जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत बैठक झाली. बैठकीमध्‍ये अपात्र दूध संस्‍थांसंदर्भात मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये याचिका दाखल करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेतलेल्‍या अवसायनातील १,३२० दूध संस्‍थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून संस्‍था पात्र, अपात्र ठरविण्‍याचा निर्णय घेण्‍याचा आदेश कोल्‍हापूर सर्किट बेंचने सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांना दिले होते. त्‍यानुसार ठाकरे यांनी संबंधित संस्‍थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली. बुधवारी (दि.१७) पात्र, अपात्र संस्‍थांचे चित्र स्‍पष्‍ट झाले. १,३२० पैकी गोकुळशी संलग्‍न असणार्‍या ५६९ दूध संस्‍था अपात्र, तर ६५६ संस्‍था पात्र ठरविण्‍यात आल्‍या.

गोकुळ संलग्‍न ५६९ संस्‍था आपत्र ठरल्‍याने याचा सर्वाधिक फटका महायुतीला बसणार आहे. महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपात्र संस्‍थांना शेवटच्‍या क्षणापर्यंत न्‍याय देण्‍यासाठी लढणार असल्‍याचे यापूर्वीच घोषित केले. त्‍यानुसार गोकुळमधील महायुतीच्‍या माजी संचालकांची बुधवारी तत्‍काळ जिल्‍हा बँकेत बैठक झाली. बैठकीमध्‍ये अपात्र संस्‍थांबाबत चर्चा झाली. कोणत्‍या तालुक्‍यातील किती संस्‍था आहेत आणि कोणाला फटका बसणार याचाही आढावा घेण्‍यात आला. चर्चेनंतर अपात्र संस्‍थांबाबत न्‍यायालयात धाव घेण्‍याचे बैठकीत ठरले.

पात्र २०, अपात्र ७५ संस्‍था ‘गोकुळ’ संलग्‍न नाहीत

कोल्हापूर : गोकुळच्या अवसायनातील १,३२० दूध संस्‍थांपैकी ६४४ दूध संस्‍था अपात्र ठरल्‍या. मात्र अपात्र ठरलेल्‍या ६४४ पैक़ी ७५ संस्‍था या गोकुळशी सलग्‍न नाहीत. त्‍यामुळे अपात्र ठरलेल्‍या ५६९ संस्‍था या गोकुळशी सलग्‍न असल्‍याने त्‍या संस्‍था यादीतून वगळण्‍यात येतील. तर ६७६ संस्‍था या पात्र ठरल्‍या आहेत. यामधील २० संस्‍था गोकुळशी सलग्‍न नाहीत. त्‍यामुळे ६७६ पैकी गोकुळ सलग्‍न असलेल्‍या ६५६ संस्‍था मतदार यादीत कायम राहिल्‍या आहेत.

यादीतून ‘त्‍या’ ५७ संस्‍था बाहेर

गोकुळने सादर केलेल्‍या ५,४७० संस्‍था सभासदांच्‍या यादीत यापूर्वीच नोंदणी रद्द झालेल्‍या २९ आणि अवसायनात निघालेल्‍या २८ संस्‍था घुसडल्‍याचे निदर्शनास आले. अवसायन प्रक्रियेत अपात्र ठरलेल्‍या ५६९ संस्‍थां व्‍यतिरिक्‍त नोंदणी रद्द आणि यापूर्वीच अवसायनात गेलेल्‍या या ५७ संस्‍था यादीतून बाहेर काढण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यानुसार यादीत आता ४,८४४ संस्‍था शिल्‍लक राहिल्‍या आहेत.

यादीतून आणखी संस्‍था कमी होण्‍याची शक्‍यता

यादीत आता ४,८४४ दूध संस्‍था शिल्‍लक राहिल्‍या आहेत. सहायक निबंधक कार्यालयातील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी बेलवाडे यांनी तक्रार केलेल्‍या २७० संस्‍थांचा निर्णय विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील देतील. तर तत्‍कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी निकाल दिलेल्‍या २६७ संस्‍थांची सुनावणी सहनिबंधक प्रज्ञा तायडे यांच्‍यासमोर सुरू आहे. या २७० आणि २६७ संस्‍थांमधूनही संस्‍था अपात्र ठरण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सध्‍याच्‍या यादीतून आणखी दूध संस्‍था कमी होण्‍याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT