कोल्हापूर : आरटीई प्रवेश प्रक्रियेत झालेल्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सध्या पुणे येथील मुख्यालयात कार्यरत असलेल्या शेंडकर यांच्या निलंबनाचे आदेश शालेय शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर रोजी काढले. आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत जादा रक्कम अदा करून आर्थिक अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.
या प्रकरणाची यापूर्वी चौकशी करण्यात आली होती. चौकशी समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला होता. दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही शेंडकर यांच्या कार्यकाळातील कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आणखी एका चौकशी समितीमार्फत त्यांच्या कामकाजाची तपासणी करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेतही शेंडकर यांच्या कारभारावरून सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आर्थिक अनियमिततेसह त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध स्तरांतून आक्षेप नोंदविण्यात आले होते. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांची पुणे मुख्यालयात बदली करण्यात आली होती. मात्र, चौकशीतील निष्कर्ष आणि गंभीर आर्थिक अनियमिततेच्या ठपक्यानंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.