कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या माजी संचालकांनी बुधवारी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन गोकुळमधील सद्यस्थितीवर चर्चा केली.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

‘गोकुळ’साठी आता तुम्हीच पुढकार घ्यावा; माजी संचालकांची दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना विनंती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (गोकुळ) गौरवशाली परंपरा आहे. जिल्ह्यातील चार लाख दूध उत्पादकांचे अर्थकारण गोकुळवर अवलंबून आहे. सध्या गोकुळवरून महायुतीतच सुरू असलेल्या वादातून संस्थेचे नुकसान होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नेत्यांमधील वाद मुख्यमंत्र्यांसमोरच सुटू शकतो. गोकुळमधील हा वाद आता आपणच सोडवू शकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोकुळच्या वादावर पडदा टाकण्यासाठी आपण पुढकार घ्यावा, अशी विनंती महायुतीच्या माजी संचालकांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना केली.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांना घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करू. गोकुळमधील वाद संपवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. जाधव यांनी दिली. ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोकुळच्या माजी संचालकांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी डॉ. जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. माजी संचालक अजित नरके म्हणाले, गोकुळ निवडणुकीतील नेतृत्त्व आणि जागा वाटपावरून हा वाद सुरू आहे. बड्या नेत्यांमध्येच वाद सुरू असल्याने तो थांबविण्यासाठी मध्यस्थी करायची कुणी, असा प्रश्न आहे. हा वाद आता आपणच सोडवू शकता. मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील नेते तुमचे नक्कीच ऐकतील. त्यामुळे गोकुळमधील वादात आपण शिष्टाई करून तो थांबवावा.

कर्णसिंह गायकवाड म्हणाले, गोकुळची निवडणूक भाजपमुळेच लांबणीवर पडली, असा संदेश जिल्ह्यात जात आहे. त्यामुळे भाजपबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. आ. शिवाजी पाटील यांचा तसा या वादामध्ये थेट संबंध नाही. त्यांना कोणीतरी पडद्यामागून मार्गदर्शन करत आहे आणि त्यानुसार ते वागत आहेत. मात्र, या सर्व घडामोडीतून गोकुळचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे हा वाद थांबवणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ माजी संचालक अरुण डोंगळे, विश्वास पाटील म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांची गोकुळची निवडणुक महायुती म्हणूनच लढायची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे. मात्र आमदार शिवाजी पाटील यांना गोकुळ मुश्रीफमुक्त हवे आहे. महायुती म्हणून आम्ही सर्व एकत्र असताना गोकुळमध्येही सर्वांनी मिळूनच पुढे जाणे आवश्यक आहे. यासाठी हा वाद मिटणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी चेअरमन नविद मुश्रीफ, माजी संचालक बाळासाहेब खाडे, किसन चौगले, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT