कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे नियोजन करा. हयगय करू नका, लागेल ती मदत केली जाईल. मुंबईच्या फेर्या आता कमी करा आणि कामाला लागा, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुनावले.
महापालिका निवडणुकीसंदर्भात माजी नगरसेवकांची बैठक शासकीय विश्रामधाम येथे सोमवारी रात्री आयोजित करण्यात आली होती. अचानक या बैठकीचे ठिकाण बदलून ती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेण्यात आली. या बैठकीत मुश्रीफ बोलत होते.
महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या वतीने लढण्याचा निर्णय झाला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसला कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करू; परंतु त्या निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. त्याकरिता आतापासून कामाला लागावे. पूर्वी आपल्या सोबत होते; परंतु काही कारणास्तव बाजूला गेले आहेत त्यांनाही आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आठ ते दहा जणांची कोअर कमिटी तयार करावी. या कमिटीने शहराचा अभ्यास करून इच्छुक उमेदवारांबाबतची माहिती घ्यावी. भागातील विकासकामांसाठी निधी दिला जाईल. शहरातील पदाधिकार्यांनी आता मुंबईच्या फेर्या कमी करून शहरात लक्ष द्यावे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
बैठकीस शहराध्यक्ष आदिल फरास, महिला शहराध्यक्ष रेखा आवळे, तसेच माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, सतीश लोळगे, महेश सावंत, प्रकाश काटे, संभाजी देवणे, आनंदराव खेडकर, परीक्षित पन्हाळाकर, नंदकुमार गुजर, विश्वास आयरेकर, वसंत कोगेकर, सत्तार मुल्ला, नागेश घोरपडे, जहिदा मुजावर, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी इनकमिंगची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील लवकरच आठ ते दहा माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
उमेदवारांच्याद़ृष्टीने ई वॉर्डकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कसबा बावड्यामध्ये देखील लक्ष घाला, असे सांगून मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.