आशिष शिंदे
कोल्हापूर : मसाई पठारावर फॉरेनच्या पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. पॅलिड हॅरिअर, मॉन्टॅग्यूज हॅरिअर, लेसर केस्ट्रल आणि युरोपियन रोलर या स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन झाले आहे. मात्र, हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या या पक्ष्यांच्या स्थलांतरावर यंदा ‘अल निनो’च्या प्रभावाचे सावट आहे.
कमी पर्जन्यमान, वाढते तापमान आणि नैसर्गिक अधिवासातील बदलांमुळे पक्ष्यांच्या स्थलांतराच्या वेळा, मुक्कामाची ठिकाणे आणि खाद्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. सध्यातरी दरवर्षी कोल्हापूर परिसरात दिसणारे पॅसेज मायग्रंट अर्थात प्रवासादरम्यान काही काळ थांबणारे स्थलांतरित पक्षी यंदाही दिसत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
मसाई पठारावर दिसणाऱ्या पक्ष्यांचा प्रवास हजारो किलोमीटरचा आहे. हे पक्षी वेस्ट एशियन ईस्ट आफ्रिकन फ्लायवे अर्थात पश्चिम आशिया पूर्व आफ्रिका स्थलांतर मार्गाशी संबंधित प्रवासमार्गांचा वापर करतात. पॅलिड हॅरिअर आणि मॉन्टॅग्यूज हॅरिअर या शिकारी पक्ष्यांच्या प्रजननाच्या जागा युरोप आणि मध्य आशियातील प्रदेशांत आहेत. त्यापैकी काही पक्षी हिवाळ्यात भारतीय उपखंडात येतात, तर काही आफ्रिकेतील प्रदेशांत जातात. पॅलिड हॅरिअरच्या अभ्यासातून कझाकिस्तानमधून भारतात येणारा मार्ग, तसेच आफ्रिकेकडे जाणारे वेगळे मार्ग असल्याचे दिसून आले आहे.
मॉन्टॅग्यूज हॅरिअरच्या उपग्रहआधारित अभ्यासातही भारतातून कझाकिस्तानकडे परतताना पक्षी हिमालयाला वळसा घालणारा मार्ग वापरत असल्याचे आढळले आहेे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात होईल, अशी माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली.
कोल्हापुरात रशिया, कझाकिस्तान, मंगोलियातून येतात पक्षी
पक्षी प्रवास करताना वाऱ्यांची दिशा, हवामान, भौगोलिक अडथळे, खाद्याची उपलब्धता आणि विश्रांतीसाठी योग्य अधिवास यांचा आधार घेतात. मध्य आशियाई स्थलांतर मार्गावरून रशिया, कझाकिस्तान आणि मंगोलियासारख्या प्रदेशांतून अनेक पक्षी भारतीय उपखंडात येतात. यातील बरेच पक्षी कोल्हापुरात येतात.
‘अल निनो’चा स्थलांतरित पक्ष्यांवर असा होतो परिणाम
‘अल निनो’चा स्थलांतरित पक्ष्यांवर परिणाम प्रामुख्याने अप्रत्यक्षपणे होतो. काही प्रदेशांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास वनस्पतींची वाढ कमी होते आणि त्यावर अवलंबून असलेल्या कीटकांसह इतर खाद्यस्रोतांची उपलब्धता बदलू शकते. परिणामी, स्थलांतरापूर्वी पक्ष्यांना आवश्यक ऊर्जा साठवण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच, प्रवासादरम्यान विश्रांती आणि खाद्यासाठी पर्यायी अधिवास शोधावे लागू शकतात.
सध्या स्थलांतरित पक्ष्यांचे कोल्हापुरात आगमन सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत पक्ष्यांची संख्या, त्यांचे आगमन आणि अधिवासातील बदलांचे निरीक्षण केल्यानंतर ‘अल निनो’चा त्यांच्यावर नेमका काय परिणाम झाला आहे, हे स्पष्ट होईल.- प्रणव देसाई, पक्षी अभ्यासक