कोल्हापूर : दारूच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बारमधील गर्दी हळूहळू कमी होऊ लागली आहे. मद्यपींची गर्दी आता शहरात मोकळ्या सार्वजनिक ठिकाणी, तर ग्रामीण भागात माळावर व रानात दिसू लागली आहे. या ओपन बारमुळे सार्वजनिक ठिकाणी दिवसेंदिवस दारू पिणार्यांची वाढत असलेली संख्या आणि त्याकडे पोलिस करत असलेले दुर्लक्ष यामुळे महिलांच्या सुरक्षिततेबरोबरच सामाजिक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शासनाच्या वतीने महसूल वाढविण्यासाठी सातत्याने दारूवरील करात वाढ करण्यात येत असल्यामुळे साध्या देशी दारूपासून विदेशी ब—ँडपर्यंत सर्वच प्रकारच्या दारूची किंमत सामान्य ग्राहकाच्या खिशाबाहेर गेली आहे. त्यामुळे बारमध्ये जाऊन दारू पिणे परवडेना झाल्याने मद्यपींकडून परवडणार्या पर्यायांचा शोध घेतला जातो. बार आणि रेस्टॉरंटमधील आकारण्यात येणार्या रकमेपेक्षा दुकानातून घेऊन बाहेर पिल्यास कमी पैसे पडतात. त्यामुळे बारऐवजी ‘ओपन बार’ म्हणजेच खुल्या जागेत दारू पिण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत.
पूर्वी शहराच्या काही विशिष्ट भागातच हा प्रकार सुरू होता; परंतु आता मात्र शहरापासून ग्रामीण भागापर्यंत ओपन बार सर्वत्र पाहावयास मिळतात. शहरात नदीकाठी, राजाराम तलाव परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, दुधाळी परिसर, शिंगणापूर रस्ता, शालिनी सिनेटोन परिसर, पुईखडी परिसर, चंबुखडी परिसर, भागातील मैदाने, कमी वर्दळ असलेल्या सार्वजनिक बागा, उपनगरांतील खुल्या जागा, शहराजवळील टेकड्या, महापालिकेच्या पडक्या इमारती, पाण्याच्या टाक्या या ठिकाणी ओपन बार जोरात भरतात. मद्य प्राशन करून कचरा, दारूच्या बाटल्या फोडणे, गोंधळ घालणे, भांडणे, महिलांची छेडछाड असे प्रकारही घडत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.