कोल्हापूर

दिवाळीसाठी सराफ बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ऐतिहासिक गुजरी शहरातील इतर भागांत पसरलेली सोन्या चांदीची बाजारपेठ सज्ज झाली आहे. दिवाळी पाडवा आणि धनत्रयोदशी हे सोने खरेदीचे प्रमुख मुहूर्त असतात. या दिवशी सोने खरेदीसाठी अनेकजण आवर्जून वाट पाहत असतात. त्यामुळे शहरातील सराफांनी जोरदार तयारी केली आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळीत सोन्याचा दर 50 हजार प्रतितोळा होता. यावर्षी तो 60 हजार प्रतितोळ्याच्या पुढे गेला आहे, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही बाजारात उत्साह कायम आहे.

सराफ असोसिएशनच्या वतीने दिवाळीनिमित्ताने गुजरीत भव्य प्रवेशद्वार उभे केले आहे. कोल्हापूरच्या गुजरीत खास कोल्हापुरी पारंपरिक दागिने बनविणारे कारागीर गेल्या काही महिन्यांपासून दिवाळीसाठी दागिने घडवण्यात गुंतलेले आहेत. पारंपरिक कोल्हापुरी साज, ठुशी, वेगवेगळ्या आकारातील आणि प्रकारातील मणी तयार करण्याची लगबग सध्या सुरू आहे. दागिने घडवून देण्यासाठी शंभर वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या गुजरीमध्ये आपल्या आवडीनुसार दागिना घडवण्यासाठी अनेकांनी ऑर्डर्स दिल्या आहेत. या दागिन्यांच्या ऑर्डर्स धनत्रयोदशी किंवा दिवाळी पाडव्यादिवशी पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे गुजरीतील कारागीर वेळेवर ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाईम करताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून लाइटवेट दागिन्यांची मोठी क्रेझ निर्माण झाली असून, ग्राहकांच्या पसंतीनुसार आता ब—ेसलेट, पॅडटस्, बांगड्या, अंगठ्या आदी विविध प्रकाराचे दागिने लाइटवेटमध्येही उपलब्ध आहेत, अशी माहिती सराफा व्यापारी दत्ता सावंत यांनी दिली.
मंगळसूत्रामध्ये अनेक नवनवीन प्रकार आले असून, अंगठ्यांमध्ये सध्या खड्यांची तसेच डायमंडच्या अंगठ्यांची क्रेझ वाढल्याचे त्यांनी सांगितले. बदाम प्रकारास नेहमीसारखी मागणी आहे. तसेच शुद्ध सोने खरेदीकडेही लोकांचा कल वाढला आहे.

भेटवस्तू देण्यासाठी कॉईनला मागणी

भेटवस्तू म्हणून देण्यासाठी देवदेवतांची चित्र असलेल्या सोने-चांदीच्या कॉईनला चांगली मागणी आहे. सोने गुंतवणुकीतून सोन्यासारखा परतावा मिळत असल्याने या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यास अनेकजण प्राधान्य देतात. बुधवारी सोने 61 हजार 150 रुपये प्रतितोळा तर चांदीचा भाव 71 हजार रुपये प्रतिकिलो होतो. दरम्यान, दिवाळी सणांच्या लगोलग लगीनसराई येत असल्याने त्याची खरेदीही यांच शुभ मुहूर्तावर केली जाईल, अशी शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली.

SCROLL FOR NEXT