कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने फुटबॉल सामन्यादरम्यान होणारी हाणामारी रोखण्यासाठी कडक नियमावली केली आहे. तरीदेखील हाणामारीचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. रविवारी खेळाडू व हुल्लडबाज समर्थकांत हाणामारी झाली होती. दरम्यान, सोमवारी फुलेवाडी क्रीडा मंडळ आणि झुंजार क्लबच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची होऊन सामना सुरू असतानाच जोरदार हाणामारी झाली.
हुल्लडबाजीस कारणीभूत असणार्या झुंजार क्लबच्या 5, तर फुलेवाडीच्या 4 अशा एकूण 9 खेळाडूंना पंचांनी ‘रेड कार्ड’ देऊन कारवाई केली. दरम्यान, या सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळाने झुंजार क्लबचा 2-0 असा पराभव केला; तर शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालमीचा 4-1 असा पराभव करून केएस शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत आघाडी मिळविली आहे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे.
तीन सामने खेळण्यास बंदी
रविवारी झालेल्या सामन्यातील हाणामारीस कारणीभूत असणार्या खेळाडू, समर्थकांवर केएसएने कारवाई केली आहे. उत्तरेश्वर पेठेच्या 3 व संध्यामठच्या 2 जणांना ‘रेड कार्ड’ देऊन त्यांना तीन सामने खेळण्यास बंदी घातली आहे; तर संध्यामठचा खेळाडू मुद्दर मुल्ला याला कडक शब्दांत समज दिली आहे. उत्तरेश्वर समर्थकांनी केएसएच्या नियम 20 चे उल्लंघन केल्याने 2 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.