कोल्हापूर : बेकायदा गर्भलिंग निदान, गर्भपात रॅकेटमधील दोन एजंटांना करवीर पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. नितीन बळवंत किल्लेदार (35, रा. कंदलगाव, ता. करवीर) व विक्रम वसंत चव्हाण (39, संत मळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. टोळीशी संबंधित सांगली जिल्ह्यातील काही एजंटांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. संबंधितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
आरोग्य विभागासह करवीर पोलिसांनी बालिंगा (ता. करवीर) येथील बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील याच्या रो हाऊसवर छापा टाकून गर्भलिंग निदान व गर्भपात सेंटरचा पर्दाफाश केला होता. सूत्रधाराने पलायन केले. मात्र एजंट दिगंबर मारुती किल्लेदार (48, रा. टिटवे, राधानगरी) तपास पथकाच्या हाताला लागला. कारवाईत पोलिसांनी सोनोग्राफी मशिन,जेल बॉटलसह अन्य साहित्य जप्त केले होते. या प्रकरणात सूत्रधाराचा भाऊ सौरभ पाटील यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
संशयिताच्या चौकशीत कंदलगाव व इचलकरंजी येथील एजंटांची नावे निष्पन्न झाली. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह पथकाने छापेमारी करून एजंट नितीन किल्लेदार व विक्रम चव्हाण यांना ताब्यात घेतले. संशयितांना न्यायालयाने 9 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला आहे.
काही महिलांचीही नावे निष्पन्न
सूत्रधार स्वप्नील पाटील याच्या सेंटरवर गर्भलिंग निदान केलेल्या काही महिलांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी सहा महिलांचे जबाब घेतले आहेत. चौकशीतून सांगली जिल्ह्यातील काही एजंटांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. संबंधितांना ताब्यात घेण्यासाठी सायंकाळी पोलिसांनी पथके रवाना करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटील याच्या अटकेनंतर गर्भलिंग निदान, गर्भपात प्रकरणीतील व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे, असे पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.