Flood waters of Panchganga entered the city
कोल्हापूर : पंचगंगेच्या महापुराचे पाणी शहरात शिरत असून, शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात पुराचे पाणी आले आहे.  Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood updates | कोल्हापूर : महापुराचे पाणी शहरात घुसले, नागरिकांचे स्थलांतर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या सात दिवसांपासून संथगतीने वाढणार्‍या पंचगंगेच्या महापुराचे पाणी शुक्रवारी सकाळी अखेर शहरातील (Kolhapur Flood updates) अनेक भागांत घुसले. यात प्रामुख्याने शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर, मुक्त सैनिक वसाहतसह अनेक भागांचा समावेश आहे. सायंकाळी जयंती नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पंचगंगेची पूर पातळी रात्री 11 वाजता 46.4 फुटांवर गेली. तर शनिवारी सकाळी 9 वाजता पाणी पातळी 47 फूट 02 इंचावर पोहोचली. पूर पातळी वाढत असल्याने आणखी काही वसाहतींत पाणी शिरण्याची शक्यता आहे. पाणी वाढत चाललेल्या परिसरातून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.

दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले असून, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. यामुळे शहराला बसलेला महापुराचा विळखा घट्ट होत चालला आहे. यामुळे नागरिकांची धास्तीही वाढत चालली आहे. जिल्ह्यातील पूरस्थितीही बिकट होत चालली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात आजअखेर 5 हजारांवर नागरिक आणि 3 हजारांवर जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूरवासीयांची धाकधूक वाढवणार्‍या पंचगंगेच्या महापुराचे पाणी गुरुवारी रात्रीच कुंभार गल्ली परिसरात येण्यास सुरुवात झाली होती. शुक्रवारपासून व्हीनस कॉर्नर, मुक्त सैनिक वसाहत, बापट कॅम्प, सीता कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत आदी भागांत शिरण्यास सुरुवात झाली. पाणी शहराच्या मुख्य भागात आल्याने नागरिकांची भीती वाढली. संभाव्य पाणी येणार्‍या परिसरातील नागरिकांसह दुकानदार, व्यापारी यांनीही साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली.

Kolhapur Flood updates : व्हीनस कॉर्नर परिसरात पाणी वाढले

सकाळी व्हीनस कॉर्नर परिसरात आलेल्या पाण्याची सायंकाळनंतर पातळी वाढत गेली. रात्री हे पाणी व्हीनस कॉर्नर चौकात मुख्य रस्त्यापर्यंत आले. स्टेशन रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर सायंकाळी ओढ्याचे पाणी अचानक वाढले. त्यातूनच वाहनधारकांना मार्ग काढावा लागला. पुराचे पाणी वाढत गेल्याने जयंती नाल्यावर सायंकाळी पाणी आले. यामुळे दसरा चौक ते महावीर कॉलेजच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. रात्री उशिरा दोन्ही मार्गांवर पाणी आले, त्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला. व्हीनस कॉर्नर-कोंडा ओळ मार्गावर हरिनारायण मंदिरासमोर पाणी आले. यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली. पंचगंगेची पाणी पातळी शुक्रवारी सकाळी सहा वाजता 44.4 फुटांवर होती. रात्री दहा वाजता ती 46.2 फुटांवर गेली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील पुराची स्थिती बिकट

जिल्ह्यातही पुराची स्थिती बिकट होत चालली आहे. धामणी खोर्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे, अंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी, गवशी आदी गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. या गावांत गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठाही खंडित आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरील वाहतूक बंद केली आहे, त्यातच बालिंगा-दोनवडेदरम्यान पाणी आल्याने या परिसरातील 30 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आलेल्या पाण्याची पातळी आणखी वाढली. चिखली, आंबेवाडी गावांत घुसलेल्या पाण्याची पातळीही वाढतच चालली आहे. शिरोळ तालुक्यातही नृसिंहवाडी, कुरुंदवाड आदी परिसरात पूर पातळी वाढत चालली आहे. कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-रत्नागिरी हे मार्ग बंद आहेत. पन्हाळा, शाहूवाडी, रत्नागिरी आदींसाठी सध्या वाठार, वारणानगरमार्गे वाहतूक सुरू आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरही सांगली फाट्याजवळ सेवा मार्गावर दोन्ही बाजूला आलेले पाणी वाढत आहे. यासह जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग व 37 प्रमुख जिल्हा मार्ग, असे एकूण 48 मार्ग बंद आहेत.

धरणांतून पाण्याचा विसर्ग

राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे खुले होते. त्यापैकी दोन दरवाजे शुक्रवारी बंद झाले. सध्या पाच धरणांतून 8 हजार 640 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातील पाण्याचा विसर्गही 15 हजार 785 क्युसेक इतका करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी काही काळ पावसाने उघडीप दिली होती. कडकडीत ऊनही पडले होते. मात्र, दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाची संततधार सायंकाळपर्यंत सुरू होती. जिल्ह्यातही पावसाचा जोर म्हणावा तसा कमी झाला नाही. जिल्ह्यात शुकवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 67 मि.मी. पाऊस झाला. हातकणंगले (71.6), पन्हाळा (91.9), शाहूवाडी (123.8), राधानगरी (94.4), करवीर (67.7), भुदरगड (65.2) व आजरा (68.8) या सात तालुक्यांत अतिवृष्टी झाली. कोल्हापूर शहरातही गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली असून, 104 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पावसामुळे जिल्ह्यात घरांची तसेच जनावरांच्या गोठ्यांची पडझड सुरूच आहे. गेल्या 24 तासांत एका सार्वजनिक मालमत्तेचे 75 हजार रुपयांचे, तर 264 खासगी मालमत्तांचे 97 लाख 62 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 39 पक्क्या घरांची, तर 201 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. जनावरांच्या 24 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 46 मार्गांवरील एसटी सेवा बंद

जिल्ह्यातील 46 मार्गांवरील एस.टी.ची सेवा पूर्ण बंद झाली आहे. यामध्ये कोल्हापूर आगारातील दोन, संभाजीनगर 4, इचलकरंजी 8, गडहिंग्लज 12, गारगोटी 1, मलकापूर दोन, चंदगड 11, कुरुंदवाड 3, राधानगरी 1, आजरा आगारातील दोन मार्गांवरील एस.टी. सेवा पूर्णपणे बंद झाली आहे.

‘या’ धरण क्षेत्रांत 200 मि.मी.हून अधिक पाऊस

गेल्या 24 तासांत राधानगरी 234, तुळशी 201, कासारी 211, कडवी 209, चित्री 245, घटप्रभा 235, सर्फनाला 330, कोदे 284 या धरण क्षेत्रांत 200 मि.मी.हून अधिक पाऊस झाला आहे.

SCROLL FOR NEXT