Kolhapur flood
कोल्हापुरला पुराचा धोका वाढला; पंचगंगा इशारा पातळीजवळ  file photo
कोल्हापूर

Kolhapur Monsoon Update | कोल्हापूरला पुराचा धोका वाढला; पंचगंगेला इशारा पातळी गाठायला ३ इंच बाकी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ३८.९ फुटांवर पोहोचली आहे. इशारा पातळी गाठण्यासाठी फक्त ३ इंच बाकी असून धोका पातळी गाठायला अजून ४ फूट बाकी आहे. पुढच्या दोन तासांत नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली गेले असून दीडशेवर गावांचा थेट संपर्क तुटला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगा इशारा पातळीजवळ आल्याने पुराचा धोका वाढला आहे. दरम्यान, प्रयाग चिखली परिसरातील नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. पंचगंगा नदीकाठच्या गावांतील लोकांना प्रशासनाने सावधानेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर-कराड राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी

सर्वत्र धुवाँधार पाऊस सुरू असून कोल्हापूर-कराड राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर ते कराड ७० किलोमीटर अंतर कापायला अनेकांना ५ तास लागत आहेत. महामार्गाचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने मोठी वाहतुक कोंडी होत आहे. अनेकांनी व्हिडिओ बनवत महत्वाचे काम नसेल तर महामार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग पुन्हा सुरू

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग रस्त्यावर आलेले पाणी कमी झाल्यामुळे पुन्हा सुरू झाला आहे. रविवारी सायंकाळी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद झाला होता. मात्र महामार्ग पुन्हा सुरू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. कोल्हापूर-गगनबावडा महामार्ग मात्र अद्याप बंदच आहे. या मार्गावर ३ वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

SCROLL FOR NEXT