कुरुंदवाड : कृष्णा-पंचगंगा संगम घाटावरील ऐतिहासिक इमारतीवर 110 वर्षांपासूनच्या कोरलेल्या नोंदी. Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur : 110 वर्षांच्या नोंदी सांगतात, महापूर ‘अलमट्टी’मुळेच!

कुरुंदवाडच्या कृष्णा घाटावर पूर-महापुराच्या 1914 पासूनच्या नोंदी; ‘अलमट्टी’नंतरच्या फरकाचीही नोंद

पुढारी वृत्तसेवा
जमीर पठाण

कुरुंदवाड : कुरुंदवाड येथील कृष्णा घाटावर केंद्रीय जल आयोगाने 1914 सालापासून 2024 पर्यंतच्या महापुराच्या पाणी पातळीच्या नोंदी सुरक्षितपणे कोरून ठेवल्या आहेत. या नोंदींवरून हे स्पष्ट होते की, अलमट्टी धरण होण्यापूर्वीसुद्धा इथे पूर आणि महापूर येतच होते; पण त्यांची तीव्रता एवढी भयावह नव्हती. अलमट्टी धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मात्र महापुराचे स्वरूप प्रलयंकारी बनत गेले आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील महापुराला अलमट्टी धरणच कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

1914 ते 2005 या काळात जेव्हा कृष्णा नदीच्या प्रवाहात कोणतेही मोठे मानवनिर्मित अडथळे नव्हते, तेव्हा महापुराच्या काळात नदीतील पाण्याचा विसर्ग सरासरी 6,000 क्युसेक इतका असायचा. त्यामुळे पाणी घाटावरून ओसंडून वाहिल्यानंतर दोन ते तीन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात येत असे. या काळातील अनेक पूर म्हणजे महापूर म्हणून नोंदले गेले असले, तरी त्यांचा धोका तात्पुरता आणि मर्यादित स्वरूपाचा होता.

2005 साली अलमट्टी धरणात पाणी अडवण्यास सुरुवात झाली आणि त्याच वर्षी कृष्णा घाटावर विनाशकारी पूर आला. त्यावेळी अलमट्टी धरणातील पाणी पातळी 519 मीटरपर्यंत ठेवण्यात आली होती. यानंतर 2019 साली ती 520.95 मीटरपर्यंत वाढवण्यात आली आणि याच वर्षी आणखी एक भीषण महापूर आला. हे दोन्ही पूर इतक्या तीव्रतेचे होते की, अनेक भागांत लोकांना घरे सोडून स्थलांतर करावे लागले.

अलमट्टी धरणात पाणी अडवल्यामुळे आणि नदीपात्रात इतर ठिकाणी (जसे की हिप्परगी धरण) अडथळे निर्माण झाल्यामुळे विसर्गाचा वेग अर्ध्याहून अधिक प्रमाणात कमी झाला. पूर्वी इथून 6,000 क्युसेकने विसर्ग होत होता, तो सध्या केवळ 3,000 क्युसेक इतकाच राहिलेला आहे. त्यामुळे पूर केवळ मोठा येत नाही, तर आठवडाभर तुंबतो, पाणी ओसरण्यास खूप वेळ लागतो आणि परिसरात प्रचंड नुकसान होते.

केंद्रीय जल आयोगाने कृष्णा घाटाच्या ऐतिहासिक इमारतीवर विविध वर्षी आलेल्या पुराच्या पाणी पातळीच्या नोंदी कोरून ठेवलेल्या आहेत. या नोंदींच्या तुलनात्मक अभ्यासातून स्पष्ट होते की, अलमट्टी धरण अस्तित्वात येण्यापूर्वी पूर लवकर ओसरत होता आणि त्याचा धोका कमी होता, तर आता पूर जास्त काळ राहतो आणि नुकसानही अधिक होते. सांगली, कोल्हापूर जिल्हा व शिरोळ तालुका यासारख्या भागांतील नागरिक दरवर्षी पूरस्थितीचा सामना करत आहेत.

या संपूर्ण परिस्थितीचा गांभीर्याने अभ्यास करून अलमट्टी व इतर धरणांतील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे, विसर्ग वाढवणे आणि नदीच्या प्रवाहात अडथळे कमी करणे आवश्यक आहे. तसेच, निर्णय प्रक्रियेत स्थानिक नागरिकांच्या अनुभवांची नोंद घेतली पाहिजे. धरणाची उंची वाढवण्याआधी त्याचा सामाजिक, पर्यावरणीय आणि जलप्रवाह व्यवस्थेवरील परिणामांचा सखोल अभ्यास व्हावा आणि त्या अनुषंगाने खुली चर्चा करावी, अशी जनतेची ठाम मागणी आहे.

‘अलमट्टी’मुळेच महापूर!

कुरुंदवाडसह कृष्णा खोर्‍यातील नागरिक गेल्या दोन दशकांपासून वारंवार येणार्‍या महापुराचा गंभीर फटका सहन करत आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या ऐतिहासिक नोंदींवरून स्पष्ट होते की, अलमट्टी व इतर धरणांत पाणी अडवल्यामुळे पूर लवकर ओसरण्याऐवजी आठवडाभर तुंबतो. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान होते. ही परिस्थिती केवळ नैसर्गिक नसून, चुकीच्या जलप्रवाह व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीपात्रात झालेल्या अडथळ्यांना तत्काळ हटवणे आवश्यक आहे.
धनाजी चुडमुंगे, संस्थापक, आंदोलन अंकुश संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT