कोल्हापूर : सततच्या पुराचा सामना करणार्या कोल्हापूरसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले असून 524 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पूरनियंत्रण प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामधील कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून त्यानुसार निविदा काढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून आणि जागतिक बँकेच्या सहकार्यातून ही कामे होणार आहेत.
कोल्हापूर शहरात 2005, 2019 आणि 2021 या वर्षांत पुरामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. पावसाळ्यात दरवर्षी पुराची भीती असते. ही समस्या लक्षात घेऊन महापालिकेने तज्ज्ञ सल्लागार संस्थेमार्फत स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मास्टर प्लॅन व डीपीआर तयार केला असून, त्यावर आधारित पूर नियंत्रणासाठीची कामे आता प्रत्यक्षात येणार आहेत.
नाल्यांच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार करण्यात येणार असून शेंडा पार्क व शिवाजी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण, तलावांची सफाई, नाला बंधारे व हरित पट्टा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच नाल्याच्या किनार्यावर हरित क्षेत्र विकसित करून पर्यावरणपूरक उपायांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सर्व कामांची निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असून पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी कोल्हापुरात विभागवार योजना राबवली जाणार असून प्राथमिकतेने जयंती नाल्याची सुधारणा, कल्व्हर्टस्चे काम आणि पूरप्रवण भागांतील उपाययोजना सुरू होतील.या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर शहराला पूरस्थितीतून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल.
कल्व्हर्ट म्हणजे पाण्याच्या प्रवाहासाठी रस्त्याखालून बांधलेली टनेलसारखी संरचना. ती शहरातील पूर आणि तुंबलेल्या पाण्याचा गतीने निचरा करते. शहरात अनेक ठिकाणी जुन्या, अरुंद किंवा तुटलेल्या कल्व्हर्टस्मुळे पाणी साचते. अशा 137 ठिकाणी नवीन ‘बॉक्स कल्व्हर्टस्’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणी विनाअडथळा वाहून जाईल.
37.16 किमी नवीन नाल्यांचे बांधकाम
जयंती नाल्याची 9.5 किमी पुनर्रचना व 6.62 किमी रस्ता बाजूचे नाले
137 बॉक्स कल्व्हर्टस्ची स्थापना
कळंबा तलावावर स्लुईस गेट : पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी
29 पूरप्रवण भागांमध्ये सुधारणा
10 ठिकाणी गाळ काढणे, 26 किमी नाल्यांची साफसफाई
महापालिका, सरकारी इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक