Maharashtra Budget 2026 | ‘महापूर नियंत्रण’ कामास मिळणार गती File Photo
कोल्हापूर

Maharashtra Budget 2026 | ‘महापूर नियंत्रण’ कामास मिळणार गती

राज्याच्या अर्थसंकल्पात सकारात्मक निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सुनील सकटे

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली शहरात महापुराने होणारे नुकसान टाळण्याबरोबरच महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला वळविण्यासाठी 2 हजार 240 कोटी रुपयांची महापूर नियंत्रण योजना जागतिक बँकेने मंजूर केली आहे. यापैकी 70 टक्के निधी जागतिक बँक आणि 30 टक्के राज्य सरकार देणार आहे. शुक्रवारी या प्रकल्पाबाबत अर्थसंकल्पात सकारात्मक निर्णय झाल्याने या महापूर नियंत्रण कामास गती मिळणार आहे.

महापूर नियंत्रण योजनेतील पहिल्या टप्प्याची 30 टक्के रकमेची कामे राज्य शासन करणार आहे. या प्रकल्पातील एक हजार कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यातील कामे निश्चित झाली आहेत. त्यापैकी 516 कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राधानगरी धरण आणि सांगली केटीवेअर अशी सुमारे 516 कोटी रुपयांची कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजाच्या शेजारी नव्याने तीन वक्राकार दरवाजे बसविण्यात येणार आहेत. वक्राकार दरवाजामुळे पावसाचा अंदाज, धरणातील पाणीसाठा आणि लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची पाण्याची मागणी व महापुराची शक्यता या सर्व गोष्टी गृहीत धरून पाणी सोडण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे. विजेवर चालू-बंद करता येणार्‍या वक्राकार दरवाजामुळे स्वयंचलित दरवाजाच्या काही मीटर खाली जाऊन पाणी सोडणे शक्य होणार आहे. वक्राकार दरवाजाबरोबरच धरणाच्या तीन सर्व्हिस गेटला हायड्रोलिक हॉईस्ट यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हायड्रोलिक हॉईस्टने दरवाजे उचलल्यामुळे पाणी सोडण्याचे काम सोपे होणार आहे. यासाठी 152 कोटी रुपये खर्च येणार आहे.

सांगली येथील सांगली केटीवेअरच्या शेजारी बॅरेज बांधण्यात येणार आहे. 200 मीटर लांबीचा आणि सुमारे आठ मीटर उंचीचा हा बॅरेज बांधल्यामुळे साठवण क्षमता वाढून पूरस्थिती कमी होण्यास मदत होणार आहे. या कामासाठी अंदाजे 364 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि अंदाजपत्रक मुख्य अभियंता कार्यालयास पाठविण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया सुरू आहे.

योजनेतील पहिल्या टप्प्यात होणारी कामे

* राधानगरी धरण स्वयंचलित दरवाजाशेजारी तीन वक्राकार दरवाजे

* धरणाच्या तीन सर्व्हिस गेटला हायड्रोलिक हॉईस्ट यंत्रणा बसविणार

* वक्राकार दरवाजामुळे स्वयंचलित दरवाजाखालून पाणी सोडता येणार

* सांगली केटीवेअरशेजारी बॅरेज बांधणार

* बॅरेजमुळे पुराचे पाणी साठवणे शक्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT