कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली शहरात महापुराने होणारे नुकसान टाळण्याबरोबरच महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला वळविण्यासाठी 3 हजार 200 कोटी रुपयांची पूर नियंत्रण योजना जागतिक बँकेने मंजूर केली आहे. एक हजार कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यातील कामे निश्चित झाली आहेत. त्यापैकी 516 कोटी रुपयांच्या कामांची निविदा पंधरा दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महापूर नियंत्रण योजनेतील पहिल्या टप्प्याची 30 टक्के रकमेची कामे राज्य शासन करणार आहे. त्यापैकी राधानगरी धरण आणि सांगली केटीवेअर अशी सुमारे 516 कोटी रुपयांची कामांची निविदा प्रसिद्ध होणार आहे. योजनेतील पहिल्या टप्प्यात राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजाच्या शेजारी नव्याने तीन वक्राकार दरवाजे बसविण्यात येणार आहेत. या वक्राकार दरवाजामुळे पावसाचा अंदाज, धरणातील पाणीसाठा आणि लाभक्षेत्रातील शेतकर्यांची पाण्याची मागणी व महापुराची शक्यता या सर्व गोष्टी गृहीत धरून पाणी सोडण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे. विजेवर चालू बंद करता येणार्या या वक्राकार दरवाजामुळे स्वयंचलित दरवाजाच्या काही मीटर खाली जाऊन पाणी सोडणे शक्य होणार आहे.
वक्राकार दरवाजाबरोबरच धरणाच्या तीन सर्व्हिस गेटला हायड्रोलिक हॉईस्ट यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हायड्रोलिक हॉईस्टने दरवाजे उचलल्यामुळे पाणी सोडण्याचे काम सोपे होणार आहे. यासाठी 152 कोटी रुपये खर्च येणार आहे.
सांगली येथील सांगली केटीवेअरच्या शेजारी बॅरेज बांधण्यात येणार आहे. 200 मीटर लांबीचा आणि सुमारे आठ मीटर उंचीचा हा बॅरेज बांधल्यामुळे साठवण क्षमता वाढून पूरस्थिती कमी होण्यास मदत होणार आहे. या कामासाठी अंदाजे 364 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि अंदाजपत्रक मुख्य अभियंता कार्यालयास पाठविण्यात आले आहे. मुख्य अभियंता कार्यालयात त्यावर छाननी सुरू आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांत निविदा काढण्यात येणार आहे.