Khidrapur Kopeshwar temple | खिद्रापूर मंदिरसंदर्भात पाच सदस्यीय न्यायालयीन समिती नियुक्त  
कोल्हापूर

Khidrapur Kopeshwar temple | खिद्रापूर मंदिरसंदर्भात पाच सदस्यीय न्यायालयीन समिती नियुक्त

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिरसंदर्भातील प्रकरणात कोल्हापूर सर्किट खंडपीठाने पाच सदस्यीय न्यायालयीन समिती नियुक्त केली आहे. आतापर्यंत न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे संबंधित प्राधिकरणाने काटेकोर पालन करावे तसेच वस्तुस्थितीची स्वतंत्र पडताळणी व्हावी, यासाठी ही समिती नियुक्त करण्यात येत असल्याचे आदेश सर्किट खंडपीठाचे न्यायमूर्ती नांदेश एस. देशपांडे आणि न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी दिले आहेत.

मंदिरासंदर्भातील प्रकरणात पुढील आदेश देताना कोणतीही संदिग्धता राहू नये, न्यायालयास घटनास्थळाची वस्तुनिष्ठ माहिती व प्रत्यक्ष परिस्थितीचा निष्पक्ष अहवाल उपलब्ध व्हावा, या उद्देशाने समितीची नियुक्ती करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. युवराज नरवणकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. कोल्हापूर सर्किट खंडपीठाने उच्च न्यायालय विधी सहाय्यता सेवा समिती मार्फत ॲड. रितेश एम. थोबडे, ॲड. ऋग्वेद किणकर, ॲड. उत्कर्ष देसाई, ॲड. सिद्धार्थ शितोळे आणि ॲड. भार्गवी पाटील यांची न्यायालयीन समितीवर नियुक्ती केली आहे.

समितीने खिद्रापूर येथील मंदिर परिसराला भेट देऊन ग्रामपंचायत, पोलिस पाटील, उपकार्यकारी अभियंता, याचिकाकर्ते व इतर संबंधितांशी चर्चा करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करावा, समितीच्या पाहणी दौऱ्यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी समितीला सहकार्य करावे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शक्य असल्यास समितीच्या भेटीदरम्यान उपस्थित राहून आवश्यक सहकार्य करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नियुक्त न्यायालयीन समितीने चार आठवड्यांच्या आत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी ३१ रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT