कोल्हापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुंडांच्या टोळीस शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले. रविवारी (दि. ४) मध्यरात्रीच्या सुमारास लोणार वसाहत परिसरात ही कारवाई केली. त्यांच्याकडून एक रिक्षा, मोबाईल, दोन तलवारी, हॉकी स्टिक, कटावणी, सेलवरील बॅटरी, मिरची पूड असा एक लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
रोहन ऊर्फ टिल्या सुहास होळकर (२५, रा. विचारेमाळ, कोल्हापूर), विजय ऊर्फ गदर लुमवेल सकटे (२४, रा. कनाननगर, कोल्हापूर), पियुष शंकर पवार (२३, रा. विचारेमाळ), जावेद अजीज मणेर (४०, रा. घाटगे कॉलनी, कदमवाडी), अनिल गंगाराव हिरवे (४०, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रेकॉर्डवरील ५ सराईत गुंड परिसरात दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली होती. यानुसार रविवारी रात्री त्यांनी लोणार वसाहत परिसरात सापळा रचून रिक्षातून येणाऱ्या पाचजणांना ताब्यात घेऊन दोन तलवारी, हॉकी स्टिक, कटावणीसह अन्य साहित्य जप्त केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव, सुशील गायकवाड, महेश पाटील, प्रशांत आवळे यांनी ही कारवाई केली.
पाच जणांवर ३४ गुन्हे
होळकरवर शाहूपुरी, वडगाव आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात १० गुन्हे, सकटेवर शाहूपुरीत ५, पवारवर शाहूपुरीत ११, मणेरवर शाहूपुरीत १ आणि हिरवे याच्यावर शाहूपुरी पोलिसांत ६ असे एकूण ३४ गुन्हे दाखल आहेत. पाचही आरोपी सराईत असून, पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या.