कोल्हापूर : यंदा वळवाचा पहिला पाऊस जिल्ह्यात गुरुवारी जोरदार बरसला अन् दुपारी 37 च्या पुढे असलेला पारा घसरून 24 अंशांवर आला. असह्य उकाडा थंडगार वातावरणात बदलला आणि कोल्हापूरकरांना हायसे वाटले. आजरा, चंदगड, राधानगरी आणि गडहिंग्लज तालुक्यांत पावसाचा जोर होता. आजरा परिसरात तासभर झालेल्या ढगफुटीसद़ृश पावसामुळे काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले. याशिवाय वादळी वार्यांमुळे राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी सावतवाडी येथे घराचे छप्पर उडून शेजार्याच्या घरावर पडले. तर, शहरात सायंकाळनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
आजरा येथे 53 मि.मी. पाऊस झाला. त्याशिवाय चित्री 50, कासारी 29, किटवडे 27, बोरिवडे 21, तर वारणा येथे 19 मि.मी. पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी (दि. 8) देखील वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. शहरात गुरुवारी दुपारी 1 पर्यंत उन्हाचा तडाखा होता. दुपारनंतर अधूनमधून ढगाळ वातावरण होते.
कोल्हापूर, सातारासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
मुंबई : ‘अल निनो’चा प्रभाव आणि हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार एन्ट्री केली असून, येत्या 3-4 दिवसांत राज्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वार्यांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपूर्व वारे सक्रिय झाल्याने आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.