First Government IVF center | पहिले सरकारी आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी केंद्र सीपीआरमध्ये होणार Pudhari File Photo
कोल्हापूर

First Government IVF center | पहिले सरकारी आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी केंद्र सीपीआरमध्ये होणार

वैद्यकीय शिक्षण विभागाची सहमती; मोफत उपचार मिळणार, लाखोंचा खर्च वाचणार

पुढारी वृत्तसेवा

एकनाथ नाईक

कोल्हापूर : आई होण्याचं स्वप्न... वडील होण्याची आस... घरात बाळाच्या पावलांचा आवाज घुमावा... अंगणात किलबिलाट व्हावा... या स्वप्नांसाठी अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत आहेत. पण आता छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सीपीआरमध्ये लवकरच राज्यातील पहिले आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू होणार आहे. ही सुविधा पूर्णतः मोफत असणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने यासाठी सहमती दर्शवली आहे.

बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताण, अयोग्य आहारपद्धती, पर्यावरणीय बदल आणि वैद्यकीय कारणांमुळे वंध्यत्वाची समस्या गंभीर होत आहे. त्यातून विवाहानंतर वर्षानुवर्षे अपत्यप्राप्ती न झाल्याने मानसिक ताण, सामाजिक दबाव आणि कुटुंबीयाच्या अपेक्षांचे ओझे अनेक जोडपी शांतपणे सहन करत आहेत. यावरील उपचारावर खासगी रुग्णालयांमध्ये एका सायकलसाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. अनेकदा एकाहून अधिक सायकल करावी लागते. हा खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी परवडणारा नसल्याने अनेकांनी उपचार अर्धवट सोडले, तर काहींनी अपत्याची आशाच सोडली आहे. सीपीआरमध्ये ही उपचार पद्धती सुरू झाल्यानंतर नवी पहाट उगवणार हे मात्र निश्चित आहे. येथे अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध होणार आहे. यामुळे हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.

अनेकांच्या घरात गोकुळ नांदणार

वंध्यत्व ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती भावनिक वेदनांची कहाणी आहे. समाजातील टोमणे, नात्यातील कुजबुज आणि नैराश्य यामुळे अनेक जोडपी खचून जातात. अशा वेळी सीपीआरमध्ये सुरू होणारे वंध्यत्व निवारण केंद्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातील नवसंजीवनी ठरणार आहे. सीपीआर येथे ही उपचार पद्धती सुरू व्हावी यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

सीमाभागातील कुटुंबांनाही दिलासा

सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील तसेच कर्नाटक सीमेलगतच्या गावांतील अनेक जोडप्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत या भागातील जोडप्यांना मोठ्या शहरात जाऊन उपचार घ्यावे लागत होते. उपचारांचा खर्च यामुळे मानसिक व आर्थिक ताण वाढत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT