कोल्हापूर : ‘साहित्यरत्न’ म्हणून उपाधी मिळविणार्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे तथा तुकाराम भाऊराव साठे यांचे स्मृती आणि स्फूर्ती सदन कोल्हापुरात साकारत आहे. राजारामपुरीत होणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे राज्यातील हे पहिलेच स्मृतिसदन आहे. त्यासाठी 2 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर झाला असून, कामही सुरू करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी स्मारकाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे.
शहरातील राजारामपुरी, मातंग वसाहत येथे बहुतांश लोकवस्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांची आहे. यामध्ये प्रामुख्याने कष्टकरी, रोजंदारी, आरोग्य व स्वच्छता क्षेत्रामध्ये काम करणार्या लोकांचा समावेश आहे. या परिसरातील लोकवस्ती दाटवस्तीची असून, या ठिकाणी वास्तव्य करणार्या नागरिकांना शैक्षणिक सुविधा (वाचनालय, ग्रंथालयासह इतर), अनुषंगिक साधनसामग्री व पायाभूत सेवासुविधा अपुर्या पडत आहेत.
या परिसरातील नागरिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची अण्णा भाऊंच्या कृतिशील विचारांचे स्मारक करण्याची मागणी होती. त्या ठिकाणी लेखन, साहित्य, शाहीर कथा, कादंबर्या लोकशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. त्या मागणीला मूर्त स्वरूप देण्याच्या द़ृष्टीने महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अण्णा भाऊ साठे यांचे चिरंतर स्मारक भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी उभारण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून निधी मंजूर झाला आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन इमारत उभारणी करण्याचा संकल्प केला असून, त्यामध्ये परिसरातील विद्यार्थी, कष्टकरीवर्ग, संशोधक यांना वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशिक्षण केंद्र इ. शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहेत. यामधून परिसरातील नागरिकांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लोकसाहित्याचा परिचय होईल. या स्मृती व स्फूर्ती सदनामध्ये तळमजला, त्यावरील एक मजला असून, एकूण 855 चौ.मी.चे बांधकाम क्षेत्र उपलब्ध आहे. पार्किंग, पहिल्या मजल्यावर ग्रंथालय, आर्ट गॅलरी, तसेच पहिल्या आणि दुसर्या मजल्यावर वाचनालय केले जाणार आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीपूर्वी स्मृतिसदन पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक, राजकीय कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णा भाऊ हे आंबेडकरवादी विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे होते. महाराष्ट्राच्या एकूण जडणघडण व परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. त्यांनी उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न आपल्या साहित्यातून केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी, अभ्यासक त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसून येतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले.