पालकमंत्री प्रकाश आबिटकर (File Photo)
कोल्हापूर

Hospital Fire Audit : सर्वच रुग्णालयांचे होणार फायर ऑडिट; चार दिवसांत ‘एसओपी’

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी दिले. याबाबत येत्या चारच दिवसांत सर्वकष मार्गदर्शक सूचना (एसओपी) जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी पहाटे एशियन हॉस्पिटलला आग लागली. सुदैवाने कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्यात जीवितहानी झाली नाही. काही दिवसांपूर्वी अमरावतीत रुग्णालयाला लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी ही माहिती दिली.

आबिटकर म्हणाले, अमरावतीच्या घटनेनंतर एका बाजूला कारवाई होईलच; पण यापुढे राज्यातील सर्वच शासकीय आणि खासगी रुग्णालयात फायर ऑडिट केले जाईल. त्यासह याबाबत उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्‍या आहेत. शक्तिपीठ महामार्गाबाबत यापूर्वी भूमिका स्पष्ट केलेली आहे, असे सांगत आबिटकर म्हणाले, कोणताही प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे न्‍यायला पाहिजे. शक्तिपीठ महामार्गासाठी समर्थन व विरोधी भूमिका ठीक आहे. पण सगळ्यांनी संयम पाळला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयांच्या फायर ऑडिट व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत येत्या चार दिवसांत एसओपी जाहीर केली जाईल. त्यानुसार त्या सूचनांचे पालन, फायर ऑडिट आदेशाची अंमलबजावणी या सर्वांची दखल घेतली जाईल. यासाठीची सर्व यंत्रणांची दर सहा महिन्यांनी आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाईल, असेही आबिटकर यांनी सांगितले.

राजेश क्षीरसागर आमचे वरिष्ठ नेते; त्यांच्याशी आणि सहकाऱ्यांशी बोलेन

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांच्‍या मंत्रिपदाबाबतच्‍या वक्तव्यावर विचारता आबिटकर म्हणाले, आ. राजेश क्षीरसागर हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. मी त्यांच्यासह पक्षातील सहकाऱ्यांशी बोलेन. काही उणिवा असतील तर सगळ्यांनी मिळून, वरिष्ठांना घेऊन काम केले पाहिजे. पक्ष संघटना वाढवणे व एकमेकांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे, असे सांगून मंत्री आबिटकर म्‍हणाले, गणेशोत्सव उत्‍साहात साजरा करताना सर्वांना त्याचा आनंद मिळाला पाहिजे, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस हेच सक्षम गृहमंत्री

कायदा सुव्यवस्था, स्वतंत्र गृहमंत्री याबाबत खा. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना आबिटकर म्हणाले, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत. यापूर्वीही पाच वर्षे त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्रिपद सांभाळले आहे. विरोधक म्हणून टीका ठीक आहे. पण फडणवीस हे गृहमंत्रिपदाची चांगली भूमिका निभावत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT