कोल्हापूर : भारत फायनान्शियल प्रा. लि. कंपनीच्या कर्जदारांकडून वसूल केलेल्या रकमेचा भरणा न करता अपहार करून 29 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या तीन वसुली कर्मचार्यांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना अद्याप अटक झाली नव्हती.
अमोल संजय जगताप (रा. पंढरपूर), विनायक महादेव घोटणे (रा. तारदाळ, ता. हातकणंगले), पवन शिवाजी पवार (रा. नांदणी, ता. शिरोळ) अशी संशयितांची नावे आहेत. व्यवस्थापक आशुतोष अनंतकुमार साळुंखे (वय 27, रा. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. सानेगुरुजी वसाहत मेन रोडवर कार्यालय असलेल्या भारत फायनान्शियल कंपनीकडे जगताप, घोटणेसह पवन पवार वसुली कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ऑक्टोबर 2021 ते ऑगस्ट 2022 या काळात कर्जदारांकडून जगतापने 6 लाख 72 हजार 840 रुपये वसूल केले. विनायक घोटणे याने डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या काळात 65 कर्जदारांकडून 18 लाख 77 हजार 334 रुपये वसूल केले. पवन पवारने 21 कर्जदारांकडून 4 लाख 23 हजार 731 रुपये वसूल केले; पण वसूल केलेल्या रकमेचा कंपनीत भरणा केला नसल्याचे लेखापरीक्षणातून उघड झाले आहे.