इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी जागांबाबत मित्रपक्षांशी समन्वयाने चर्चा करा. सन्मानाने जागा न मिळाल्यास स्वबळावर लढा आणि संघर्ष करा व एकजुटीने महापालिकेवर राष्ट्रवादी काँग््रेासचा झेंडा फडकवा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील मेळाव्यात बोलताना केले. शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने येथे राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. माजी आ. अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत जाण्याची किमयाही केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीतही यश निश्चित मिळेल. काहीजण पक्षातून गेले म्हणून पक्षाची ताकद कमी झाली अशा भमात असतील, तर ते चुकीचे ठरतील. कागलच्या धर्तीवर इचलकरंजीतील कामगारांना 10 हजारांत स्वप्नातील घरकूल देण्याचा आमचा प्रयत्न राहील. लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे असलेले अनुदान 2100 करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, परवेज गैबान, यासीन मुजावर आदींची भाषणे झाली. नासिर अपराध यांनी आभार मानले. मेळाव्यास लतिफ गैबान, विलास गाताडे, बाळासाहेब देशमुख, शामराव कुलकर्णी, तौफिक मुजावर, राजाराम लोकरे, प्रिया बेडगे, निहाल कलावंत, सलीम शिरगावे, शिवाजी शिंदे आदींसह पदाधिकारी व कायर्कर्ते उपस्थित होते.