कोल्हापूर : निवडणुकीमुळे सुमारे महिनाभर बंद असलेला फुटबॉल हंगाम रविवारी पूर्ववत सुरू झाला. पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडू व हुल्लडबाज समर्थकात हाणामारी झाली. यामुळे मैदानात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. हाणामारीस कारणीभूत ठरलेल्या उत्तरेश्वर तालीम मंडळ व संध्यामठ तरुण मंडळाच्या 5 खेळाडूंवर रेडकार्डची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या सामन्यात उत्तरेश्वरने संध्यामठचा 2-0 असा पराभव केला. तर पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघांचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत आघाडी मिळविली. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन तर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.
शेवटच्या क्षणी उत्तरेश्वरकडून विजयी गोल
दुपारच्या सत्रातील पहिला सामना संध्यमठ तरुण मंडळ विरुध्द उत्तरेश्वर तालीम यांच्यात झाला. संपूर्णवेळ सामना अटीतटीने आणि तुल्यबळ झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. आघाडीसाठी दोन्हीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. संध्यामठच्या कपिल शिंदे, श्रवण शिंदे, ऋषीकेश भोसले यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. उत्तरेश्वरकडून अथर्व मोरे, प्रथमेश जाधव, तुषार पुनाळकर,अथर्व पाटील यांनी आघाडीसाठी केलेल्या अनेक संधी वाया गेल्या तर अनेक सोप्या संधी हुकल्या. 78 व्या मिनिटाला तुषार पुनाळकरने गोल नोंदवत 1-0 अशी आघाडी मिळवली. पाठोपाठ 80 + मिनिटाला अथर्व पाटीलने दुसरा गोल करून सामना 2-0 असा जिंकला.
ऋषीकेश मेथे-पाटीलची हॅट्ट्रिक
दुसरा सामना पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुध्द संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडीलने वर्चस्व राखले. त्यांच्या आघाडीच्या फळीतील ऋषीकेश मेथे-पाटील याने तीन गोल नोंदवत हॅट्ट्रिक साधत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. सामन्यांच्या 15 व्या मिनिटाला त्याने पहिला मैदानी गोल केला. 28 व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर दुसरा गोल करून संघाला मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात 28 व्या मिनिटाला ऋषीकेशने तिसरा गोल करून संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पाटाकडीलच्या यशराज कांबळे, नबी खान, ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, रोहित मंडलिक यांनी उत्कृष्ट खेळ केला. जुना बुधवारच्या प्रथमेश जाधव, ब—म्हा थुलूंगा, मयुर सुतार, रविराज भोसले, सचिन मोरे, शुभम जाधव यांनी गोल फेडण्यासाठी केलेले जोरदार प्रयत्न पाटाकडीलच्या भक्कम बचावामुळे अपयशी ठरले. यामुळे सामना पाटाकडील ‘अ’ने 3-0 असा एकतर्फी जिंकला.
पाच खेळाडूंवर रेडकार्डची कारवाई
संध्यामठ तरुण मंडळ विरुध्द उत्तरेश्वर तालीम मंडळ यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूत शाब्दिक बाचाबाची झाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना भिडले. उत्तरेश्वरचे काही समर्थक प्रेक्षक गॅलरीतून उड्या टाकून मैदानात उतरले. त्यांनीही खेळाडूंना हाणामारी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मैदानात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दोन्ही संघांतील खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि केएसएच्या पदाधिकार्यांनी हाणामारी करणार्या खेळाडूंना बाजूला करत वाद मिटवला. हाणामारी करणार्या दोन्ही संघांतील पाच खेळाडूंवर मुख्य पंचांनी रेड कार्डची कारवाई केली. यात संध्यामठच्या करणसिंह पाटील, मसुद मुल्ला तर उत्तरेश्वरच्या प्रवीण कांबळे, श्रीकांत माने, विश्वदीप भोसले यांचा समावेश आहे.