कोल्हापूर : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा अखंड जयघोष करत अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी (रविवारी) शहरात अनेक मंडळांनी जल्लोषी मिरवणूका काढून ‘श्री’च्या मूर्तीचे विसर्जन केले.
शिवाजी चौक तरुण मंडळाच्या 21 फुटी महागणपतीची रविवारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरती झाल्यानंतर मोरयाचा अखंड गजर करत विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला. दोन ढोलताशा पथके आणि साऊंड सिस्टीमवर केवळ गणपतीसह देवदेवतांचे लावलेले मंत्र अशा पारंपरिक वातावरणात मिरवणूक निघाली. अभिजीत सूर्यवंशी व संदीप खोत यांनीशिवाजी चौक ते पापाची तिकटीपर्यंत रस्त्यावर मोठी रांगोळी घातली होती. मंडळाच्या महिला कार्यकर्त्या भगव्या साड्या परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. गणेशभक्त महेश उर्फ साजन माने यांच्याकडून मूर्तीवर लाख रुपयांच्या गुलाब फुलांचा वर्षाव केला जात होता. चंद्रगहणाच्या समाप्तीनंतर महागणपतीच्या मूर्तीचे इराणी खणीत बाहेरगावाहून आणलेल्या विशेष क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करण्यात आले.
शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम आणि जुना बुधवार पेठ तालमीने जल्लोषी मिरवणूक काढली. विद्युत रोषणाईचा झगमगाट, साऊंड सिस्टिमचा दणदणाटावर तरूणाई थिरकली. सायंकाळी पाच वाजता या दोन्ही तालमींच्या मिरवणूकीला सुरूवात झाली. दिवसभरात छत्रपती शिवाजी चौक तरूण मंडळासह अन्य मंडळांच्या मिरवणूका निघाल्या.
रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये गणेश मूर्ती ठेवल्या होत्या. कार्यकर्त्यांनी कपाळावर तालमींच्या नावाच्या रेबीन बांधल्या होत्या. फिरंगाई तालीमच्या मिरवणुकीचे उद्घाटन मालोजीराजे, भाजपचे महेश जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शहर पोलिस उपअधिक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते झाले. तालमीचे अध्यक्ष रविकिरण इंगवले, जितू पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. फिरंगाई तालमीच्या मिरवणूकीचे खास आकर्षण श्रीकृष्णाची 21 फुट उंचीची प्रतिमा होती.
जुना बुधवार पेठेच्या मिरवणूकीचे उद्घाटन मालोजीराजे, ऋतुराज क्षीरसागर, शहर पोलिस उपअधिक्षक प्रिया पाटील, नेपोलियन सोनुले यांच्या हस्ते झाले. यावेळी तालीमीचे अध्यक्ष रणजित शिंदे, उत्सव समितीचे अध्यक्ष राहूल दिंडे, संतोष दिंडे, सुशांत महाडीक, महेश शिंदे, युवराज इंगवले, सुशिल भांदिगरे, केदार शिंदे, धनंजय सावंत, सुनिल शिंदे, निलेश हंकारे,धनाजी शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बिनखांबी गणेश मंदिर येथे फिरंगाई तालीम व जुना बुधवार पेठ तालमींच्या मिरवणूका आल्या. प्रशासनाने पोलिस वाहनांची कडे केले होते. अध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी जुना बुधवार पेठेच्या तालमीचा तर रणजित शिंदे यांनी फिरंगाई तालमीच्या मिरवणूकीचे श्रीफळ वाढविले. तालमीच्या दोन्ही अध्यक्षांनी आम्ही शांततेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडू, असे आश्वासन पोलिस प्रशासना दिले.