जयसिंगपूर : खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात होत असतानाच शेतकर्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. प्रमुख रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असून, शेतकर्यांमध्ये तीव— नाराजीचा सूर उमटत आहे. 1 एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन दरांनुसार खतांच्या प्रतिबॅगमागे 125 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना पुन्हा आर्थिक झळा बसत आहेत.
विशेष म्हणजे मागील वर्षभरात रासायनिक खतांच्या दरात झालेली ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी दोन वेळा किरकोळ वाढ करण्यात आली होती. मात्र, यावेळी झालेली वाढ ही सर्वाधिक मोठी मानली जात आहे. आखाती देशांमधील तणावामुळे कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे खत उत्पादनाचा खर्च वाढल्याचे सांगितले जात आहे.
दरवाढीसोबतच शेतकर्यांना आता ‘लिंकिंग’च्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी खत विक्रेते मुख्य खतांसोबत अनावश्यक उत्पादने घेण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. तसेच, जुन्या दराचा साठा शिल्लक असतानाही काही ठिकाणी नवीन चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खतांचा तुटवडा आणि काळाबाजार होण्याची भीती निर्माण झाली असून, प्रशासनाने यावर कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.