कागल : गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसानिमित उभारलेल्या जॉईंट व्हीलमध्ये (आकाश पाळणा) अचानक बिघाड झाल्याने 80 फूट उंच हवेतच लटकला. त्यामुळे लहान मुले, महिलांसह सुमारे 22 जण त्यामध्ये अडकले. आपण अडकल्याचे लक्षात येताच महिला, मुलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि गोंधळ उडाला. दरम्यान, रात्री उशिरा 12 जणांची सुटका करण्यात आली.
बापूसाहेब महाराज चौकात उरुसानिमित्त दोन दिवसांपासून जत्रा भरली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे 22 आबालवृद्ध आकाश पाळण्यात बसले. रात्री नऊच्या दरम्यान रॉड स्लीप होऊन हवेत पाळणा 80 फुटांवर जाऊन थांबला. त्यामुळे त्यात बसलेल्या महिला, मुलांनी घाबरून आरडाओरड सुरू केली. बघता बघता मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. त्यांच्यासह चालकांनीही पाळणा खाली घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काहीजणांनी पाळण्यावर चढून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रात्री अकरापर्यंत हे प्रयत्न सुरू होते.
मात्र काहीही उपयोग होत नव्हता. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेची मोठी क्रेन मागवण्यात आली. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, बघ्यांची गर्दी जमली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. रात्री सव्वाअकरानंतर क्रेनद्वारे अडकलेल्या नागरिकांना काढण्यास सुरुवात करण्यात आली. हे काम उशिरापर्यंत सुरू होते. कोल्हापूर महानगरपालिकेची भली मोठी क्रेन असल्याने बापूसाहेब महाराज चौक परिसरातील सर्व विद्युत पुरवठा यावेळी खंडित करण्यात आलेला होता.