गडहिंग्लज : अपघात प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदारकडून 60 हजारांची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडील सहायक पोलीस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे (वय 57) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत माहिती अशी ः तक्रारदार यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला होता. या गुन्ह्याचा तपास कांबळे हिच्याकडे होता. गुन्ह्यातील वाहन सोडवण्यासाठी तक्रारदार यांनी कांबळे हिला विनंती केली. यासाठी 60 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून यातील कलमेही कमी करण्याचे आश्वासन कांबळे हिने दिले होते. पैशाच्या मागणीला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली.
यानंतर पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शनिवारी सापळा रचून कांबळे हिला चाळीस हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानंतर गडहिंग्लज शहरातील केडीसी कॉलनीतील तिच्या घराचीही झडती घेण्यात आली. कांबळे हिची नेमणूक गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे असली, तरी बहुतांश वेळा ती निर्भया पथकात कार्यरत असल्याने पोलीस ठाण्याकडे कमी कालावधीत गुन्ह्यांच्या तपासात होती. निवृत्तीच्या अंतिम टप्प्यात असताना अशा पद्धतीने तिला कारवाईला सामोरे जावे लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे लाच घेताना सलग दुसरी महिला पोलीस सापडली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी महिला कॉन्स्टेबलला दोन हजारांची लाच घेताना पकडले होते. आता तब्बल 40 हजारांची लाच घेताना पकडले आहे.