कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेनेही कार्यवाहीस सुरुवात केली आहे. यापुढे भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही खायला घालता येणार नाही. यासाठी महापालिकेची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. नागरिकांनी नियमानुसार अर्ज करून परवानगी घेतल्याशिवाय कुत्र्यांना खायला घालता येणार नाही.
महापालिका शहरात काही विशिष्ट स्पॉटस् कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी अधिकृतपणे निश्चित करणार आहे. नागरिकांनी त्या ठिकाणीच कुत्र्यांना खाद्य देणे अपेक्षित आहे. याबाबतची अधिकृत जाहिरात महापालिकेकडून प्रसिद्ध केली असून परवानगी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव सातत्याने वाढत चालला आहे. रात्री ड्युटी संपवून घरी जाणार्या कर्मचार्यांना, महिला आणि विद्यार्थ्यांना अनेकदा कुत्र्यांच्या टोळक्यांचा सामना करावा लागतो. हल्ल्यांमध्ये जखमी होण्याच्या तसेच मृत्यूच्या घटनादेखील घडल्या आहेत. कसबा बावडा येथे 2005 मध्ये एका लहान मुलीवर झालेला हल्ला आजही नागरिकांच्या स्मरणात आहे.
कायद्याच्या मर्यादा, जनावरांच्या संरक्षणाचे नियम आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यामुळे महापालिकांना बंदोबस्ताची मर्यादितच कामे करता येतात. मुख्यत्वे लसीकरण आणि पकड नसबंदी परत सोडणे एवढ्याच प्रक्रियेपुरताच त्यांचा कारभार मर्यादित असतो.
नियमांचे पालन आवश्यक
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणासाठी कठोर आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे सुचविली आहेत. त्यानुसार देशभरातील महापालिकांना अंमलबजावणीची सक्ती झाली आहे. नागरिकांनी विनापरवाना कुत्र्यांना खाऊ न घालणे, निश्चित ठिकाणांचा वापर करणे आणि नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापालिकेचे आवाहन आहे.