कोल्हापूर

डबक्यांमुळे वाढली लेप्टोस्पायरोसिसची भीती

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात महापालिकेच्या गलथान कारभारामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. साचलेल्या पाण्यात प्राण्यांचे मूत्र पसरते. अशा घाणेरड्या पाण्यातून जाणार्‍या लोकांच्या पायाला जखम झाली असल्यास लेप्टोस्पायरोसिसचा धोका संभवतो. अलीकडे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण सापडलेले नाहीत; परंतु 2005 च्या महापुरानंतर मात्र शहरात मोठ्या प्रमाणात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

लेप्टो कशामुळे होतो?

पावसाळ्यात प्राणी पाण्यात लघवी करतात. ती साचलेल्या पाण्यात पसरते. हा आजार जीवाणूमुळे होतो. त्यामुळे या साचलेल्या पाण्यात जाणार्‍या व्यक्तीच्या पायाला जखम असेल, तर त्या जखमेतून लेप्टोचा आजार पसरविणारे जंतू शरीरात पसरतात. त्यामुळे हा आजार पसरतो. त्यामुळे ज्यांच्या पायाला जखम असेल त्यांनी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून किंवा महापुराच्या पाण्यातून अजिबात चालू नये. लेप्टोचा आजार हा उंदीर, घुशी, मुंगूस, डुक्कर, म्हैस, घोडा, कुत्रा आणि मांजर या प्राण्याच्या मूत्रातून पसरतो. या प्राण्यांच्या संपर्कात असणार्‍यांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे पावसातून आल्यानंतर हात, पाय साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत.

डबक्यातील पाण्याचा निचरा करावा

आपल्या घराशेजारी किंवा कार्यालयाशेजारी, कामाच्या ठिकाणाजवळ डबकी असतील आणि त्यातून जावे लागत असेल, तर त्या डबक्यात साचणार्‍या पाण्याचा निचरा महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना सांगून करायला हवा.

लेप्टोची लक्षणे

ताप येणे, सांधेदुखी, तीव्र डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ अशी प्राथमिक लक्षणे दिसल्यास नागरिकांनी कोणताही निष्काळजीपणा न दाखवता तत्काळ डॉक्टरांकडे गेले पाहिजे व योग्य ते उपचार घेतले पाहिजेत.

SCROLL FOR NEXT