सनोफर नायकवडी
इचलकरंजी : ग्रामीण भागातील गर्भवती, नवजात बालके आणि मातांसाठी ‘जीवनवाहिनी’ मानली जाणारी कोल्हापूर जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका सेवाच सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मागील पाच महिन्यांपासून या सेवेतील 23 कंत्राटी चालकांना मानधन मिळालेले नाही. निधीअभावी ही सेवा कधीही बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर होणार आहे.
सध्या जिल्ह्यातील 21 प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून ही आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा चालवली जाते. जननी सुरक्षा योजना आणि जननी शिशू सुरक्षा योजनेअंतर्गत प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर आवश्यक वैद्यकीय मदतीसाठी रुग्णांना मोफत ने-आण केली जाते. या सेवेचे व्यवस्थापन जालना येथील खासगी संस्थेकडे कंत्राटाच्या माध्यमातून दिले होते; मात्र मार्च 2025 मध्ये कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही सेवेमध्ये सातत्य राखण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने काही महिन्यांसाठी अन्य निधीतून मानधन पुरवले; परंतु त्यानंतर निधी मिळण्यात अडथळे निर्माण झाल्याने चालकांचे पगार थांबले आहेत.
मानधन न मिळाल्याने चालक आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. घर खर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च भागवणे कठीण झाल्याने अनेकांना कर्ज काढण्याची वेळ आली आहे. काहीजणांकडे उपजीविकेचे इतर साधनही नसल्याने कामबंद आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. चालक काम थांबवल्यास 102 सेवा बंद पडेल आणि प्रसूतीसाठी रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळणे अशक्य होईल.
आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते; मात्र राज्य शासनाकडून निधीच्या अपुर्या पुरवठ्यामुळे अडचण कायम आहे. सरकारी योजनेतील महत्त्वाची आरोग्यसेवा दिल्या जाणार्या कर्मचार्यांकडेच दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण कुटुंबांसाठी वाढत आहे चिंता
102 रुग्णवाहिका ही आपत्कालीन प्रसंगी ग्रामीण महिलांना तातडीची मदत मिळवून देणारी महत्त्वाची सुविधा आहे. ही सेवा बंद पडल्यास प्रसूतीसंदर्भातील गंभीर परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबांना मोठा फटका बसणार आहे. शासनाने केवळ योजनांचे यश सांगण्यात रस न ठेवता त्या प्रत्यक्ष राबवणार्या कर्मचार्यांच्या अडचणींनाही प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून चालकांचे थकीत मानधन दिले जाणे अत्यावश्यक आहे.