Pachgaon Murder Case | आई, बाबा भांडण तुमचे... जीवन उद्‌ध्‍वस्‍त होते आमचे 
कोल्हापूर

Pachgaon Murder Case | आई, बाबा भांडण तुमचे... जीवन उद्‌ध्‍वस्‍त होते आमचे

पाचगाव खुनानंतर चिमुकल्यांच्‍या मनातील प्रश्‍न दिसतात भेदरलेल्‍या चेहर्‍यावर

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : आई आणि बाबा... तुम्ही भांडायचा, एकमेकांवर हात उगारायचा. ते भांडण वाढले आणि बाबा, तुम्ही आईला मारूनच टाकले. आता आई देवाघरी गेली आणि तुम्ही कोठडीत. तुमच्या भांडणाची शिक्षा आम्हाला का? हा प्रश्न आहे आठ वर्षांच्या स्वरा आणि चार वर्षांच्या श्री या चिमुकल्यांचा.

भलेही त्यांना नीट शब्दांत मांडता येत नसेल; पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भेदरलेले भाव मनातील कालवाकालव स्पष्टपणे सांगत आहेत. आईच्या कुशीत सुरक्षित भविष्य पाहणाऱ्या अन् बाबांच्या हाताला धरून जग समजून घेणाऱ्या चिमुकल्यांच्या आयुष्याची दिशाच भरकटली आहे. पाचगाव येथील खुनाच्या घटनेनंतर शून्यात हरवलेल्या या चिमुकल्यांचा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.

पाचगावातील योगेश्वर कॉलनीत चारित्र्याच्या संशयातून गणेश कदम याने पत्नी दीपालीचा खून केल्याच्या घटनेने केवळ एका संसाराचा अंत झालेला नाही, तर दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरही कायमचे व्रण उमटले आहेत. आईचा मृत्यू आणि वडिलांवर खुनाचा आरोप, पती-पत्नीमधील संघर्षाची ही रक्तरंजित परिणती मुलांच्या वाट्याला आली आहे. मोठ्यांच्या वादात चिमुकल्यांचे बालपण किती दिवस भरकटत राहणार, या प्रश्नावरची खपली या घटनेने पुन्हा निघाली आहे.

पती-पत्नीतील वाद, हिंसा यांचा फटका मुलांना बसतो. घरातील आरडाओरड, शिवीगाळ, मारामारी आणि सततचा तणाव, यामुळे मुलांच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण होते. काही मुले शांत होतात, काही आक्रमक बनतात, काही स्वतःमध्येच गुरफटतात. त्याचा परिणाम अभ्यासावर, वर्तनावर आणि नातेसंबंधांवरही होऊ शकतो.
डॉ. कपिल सोनटक्के, मानसोपचार तज्ज्ञ
आई-वडिलांतील संशय आणि रागाची शिक्षा निष्पाप मुलांनी भोगावी, हीच शोकांतिकेची वेदनादायी बाजू आहे. त्यामुळे अशा घटनांनंतर मुलांची केवळ सुरक्षितता नव्हे, तर त्यांचे शिक्षण, मानसिक आरोग्य आणि आधार याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
नीता शिखरे, समाजशास्त्र अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT